कोल्हापूर : कोविड रुग्णांची ऑक्सिजन पातळी वाढविण्याचे काही साधे उपाय आहेत, ज्याच्यामुळे ऑक्सिजन पातळी वाढविता येऊ शकते. शिवाजी विद्यापीठात अनेक रुग्णांना ऑक्सिजन बेड उपलब्ध होईपर्यंत त्यांची अशा प्रयोगाद्वारे ऑक्सिजन पातळी वाढविली जात आहे. रुग्णांचे प्राणसुद्धा त्यामुळे वाचत असल्याची बाब समोर आली आहे.कोविड महामारी थोपविण्यासाठी संपूर्ण वैद्यकीय क्षेत्र तोंड देत आहे. सध्याची परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. त्यात ऑक्सिजनची वाढती मागणी आणि अपुरा पुरवठा याने रुग्णाचे, नातेवाइकांचे तसेच कित्येक सेवा देणाऱ्या डॉक्टर आणि स्टाफ मंडळींचे जीव टांगणीला लागले आहेत. अशावेळी काही विशिष्ट चिकित्सा उपयोगी पडते. त्याचा अवलंब शिवाजी विद्यापीठातील कोविड केअर सेंटरमध्ये करण्यात येत आहे.प्रोटोकॉल पहिला (कार्प प्रोटोकॉल) -प्रत्येक पेशंटला प्रत्येक एक ते दोन तासाला डाव्या, उजव्या कुशीवर, काही वेळ आराम खुर्चीत बसल्याप्रमाणे, तर काही वेळ विशेषतः जेवणापूर्वी दहा मिनिटे पोटावर-छातीवर झोपणे ही क्रिया करवून घेतली जाते. मानेच्या खालील कॉलर बोन ते जिथे बरगड्या संपतात तिथपर्यंतचे तीन समान भाग करून हाताचे तळवे खोलगट करून छातीवर, पाठीवर १० - १० हलके ते मध्यम स्वरूपाचे स्ट्रोक / थापटी देणे .
- फायदा काय होतो? - या क्रियेमुळे पेरिफेरल नर्व्हस, ॲक्सेसरी चेस्ट मसल्स क्रियाशील होतात व श्वसनासाठी मदत होते. कफ असल्यास नि:सारणास मदत होते. रुग्णाचे ऑक्सिजन सॅच्युरेशन/ कॉन्संट्रेशन वाढते.
दुसरा प्रोटोकॉल (अवेक प्रोन पोजिशनिंग प्रोटोकॉल) -ज्यामध्ये आपण रुग्णाचे दोन्ही हात दुमडून उशीवर ठेवून त्यावर मान एक बाजूला ठेवून, छताखाली आणि जिथे बरगड्या संपून पोटाचा भाग सुरू होतो तिथे एक छोटी उशी अथवा सपोर्टसाठी जाड दोन पदरी घडी केलेली चादर किंवा टॉवेल ठेवून व शक्य झाल्यास पायाखाली असाच सपोर्ट देऊन झोपवले जाते.
- फायदा काय होतो? - यामुळे रक्ताभिसरण सुधारते, फुफुसांची हवा साठवणेची अधिकधिक मर्यादा सुधारते. विशेषतः फुफुसाच्या वरील भागात हवा पोहोचते.. आणि चांगल्या प्रमाणात ऑक्सिजन रक्तात घेतला जातो. पेशंटना खूप लवकर बरे वाटते. श्वासोच्छ्वास सुधारतो.
या गोष्टी कोणी टाळाव्यात? बेशुद्ध असलेले रुग्ण, गरोदर माता, अति वयस्क, ज्यांना घशात पित्त वर येण्याचा खूप त्रास आहे अगर पोटात, श्वास नलिकेत, अन्ननलिकेत अल्सरचा त्रास आहे, फिट येते किंवा त्यासाठी औषधे सुरू आहेत, उलटीचा त्रास होत आहे, पित्ताशय दाह अथवा यकृत दाह होत आहे, हर्नियाचा खूप त्रास आहे इत्यादी लोकांना याचा वापर करता येत नाही.तज्ज्ञ डॉक्टर काय सांगतात?
ऑक्सिजन सॅच्युरेशन पूर्ववत करण्यात आणि पुढील धोका टाळण्यात या दोन प्रोटोकॉलमुळे यश मिळत आहे. शिवाजी विद्यापीठ कोविड सेंटरमध्ये आम्ही प्रयोग केले आहेत. ८०/८२ पर्यंत खाली आलेली ऑक्सिजन पातळी ९५/९६ पर्यंत नेण्यात आम्हाला यश आले. असा प्रोटोकॉल एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवू शकतो. ही चिकित्सा पद्धती कोविड १९ साथीविरुद्ध प्रत्यक्ष लढणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांनी वापरल्यास मोजके का असेना; पण काही रुग्णांचे जीव आपण नक्कीच वाचवू शकतो.-डॉ. सुशांत रेवडेकरवैद्यकीय अधिकारी,जिल्हा परिषद.