कोल्हापूर : राज्य शासनाकडून रस्त्यांसह मूलभूत विकासकामांसाठी २५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. तो कोरोनाविरुद्धच्या लढाईत जिवावर उदार होऊन काम करणाऱ्या सीपीआर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी आवश्यक ती सुरक्षा साधने, टेस्टिंग किट्स, औषधे, आदी घेण्याकरिता शासनाने तातडीने सीपीआर रुग्णालयाकडे वर्ग करावा, अशी मागणी भाजपचे गटनेते अजित ठाणेकर यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, महापालिकेला राज्य शासनाने अंतर्गत रस्त्यांकरिता २५ कोटी रुपये मंजूर केल्याचे वृत्त आहे. सद्य:स्थितीत संपूर्ण जगात ‘कोव्हिड १९’ विषाणू संसर्गाने थैमान घातले आहे. कोल्हापुरातही याचे काही रुग्ण सापडले आहेत. या विषाणू संसर्गाचा सामना करण्याकरिता वैद्यकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी व पोलीस अहोरात्र मेहनत घेत आहेत. त्यांच्याकडे आवश्यक अनेक गोष्टींची कमतरता असल्याचे दिसत आहे.
निधी नसल्यामुळे सुरक्षा साधनांची कमतरता आहे. त्याचबरोबर शासनाने या महिन्यात महापालिकेला २५ कोटींचा निधी मंजूर केला. निधीबाबत सध्याच्या लॉकडाऊनच्या वातावरणात सर्व प्रशासकीय प्रक्रिया पार पडून शासन आदेशानुसार असलेल्या अंतिम दिनांकापर्यंत काम पूर्ण होणे अशक्य आहे. त्यामुळे मंजूर निधी तसाच राखीव म्हणून पडून राहण्याची शक्यताही नाकारता येत नाही.