कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात ‘भाजप’ हा पक्ष अजूनही मोठ्या झुडपांच्याच स्वरूपात राहिला आहे. त्याचा वटवृक्ष का झाला नाही, याची कारणे शोधल्यास त्याला पक्ष म्हणून काही मर्यादा आहेत, तशी राजकीय स्थितीही कारणीभूत असल्याचे दिसते. पालकमंत्री चंद्रकांतदादा हे त्यासाठी काही जरूर प्रयत्न करीत आहेत; परंतु त्याला अजूनही तसे फारसे यश आलेले नाही. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांमध्येच जी सुंदोपसुंदी आहे, तशी भाजपमध्ये नाही; परंतु ती खालच्या स्तरावर मात्र नक्की आहे. चंद्रकांतदादांना पाठबळ देईल, असे दुसऱ्या फळीतील नेतृत्वच पक्षात नसल्याने आज तरी कोल्हापूरचा भाजप दादांपासून सुरू होतो व तिथेच संपतो. सुरेश हाळवणकर यांनी इचलकरंजीच्या राजकारणात दबदबा निर्माण केला असला तरी जिल्ह्याच्या राजकारणात त्यांना अजून नेतृत्व म्हणून मान्यता मिळालेली नाही. राज्याच्या राजकारणात चंद्रकांतदादांना कमालीचे महत्त्व आले आहे; त्यामुळे त्यांच्या जिल्ह्यातील पक्षीय कामगिरीकडे नेतृत्वाचेही लक्ष आहे. नुसते सरकारचे पाठबळ असून चालत नाही. पक्ष वाढवायचा असेल, तर लोकांचे पाठबळ महत्त्वाचे असते; परंतु अजूनही भाजपला त्या पातळीवर समाधानकारक टप्पा गाठता आलेला नाही. पक्षात दादाच एकखांबी तंबू असल्यासारखी स्थिती आहे. त्यातही त्यांना मासबेस नसल्याने पक्षीय वाढीवर मर्यादा आल्या आहेत. दादांनी स्वत: विधानसभेच्या मैदानात उतरायचे म्हटले तर त्यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ नाही.कोल्हापूर जिल्ह्यात सहकारी संस्थांच्या वर्चस्वाभोवतीच राजकारण फिरते. त्यामुळे भाजपला दोन्ही काँग्रेसच्या या गडाला भगदाड पाडता आलेले नाही. सध्या या पक्षाचे दोनच आमदार आहेत. त्यांना आपले मतदारसंघ टिकवून ठेवताना दमछाक होणार आहेच. त्याशिवाय कोल्हापूर उत्तर, राधानगरी-भुदरगड आणि चंदगड मतदारसंघांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. दहापैकी पाच मतदारसंघांत लढायचे असे पक्षाचेच नियोजन आहे. दहापैकी तब्बल सात ठिकाणी पक्षाकडून ही निवडणूक लढवू शकेल, असे नेतृत्व आजच्या घडीला पक्षाकडे नाही. प. महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची जबाबदारी या पक्षाकडे आली आहे; परंतु तिच्या अध्यक्षपदावर संधी देता येईल, एवढा सक्षम माणूसच पक्षाकडे नाही.जिल्ह्यातील सहकारी संस्थांवर स्थापनेपासून आजअखेर काँग्रेसचेच वर्चस्व; त्यामुळे भाजप ‘कोल्हापूरच्या राजकारणाचा किंगमेकर’ कधी होऊ शकलेला नाही. कार्यकर्त्यांचे केडर नाही. प्रभाव पाडू शकेल असे नेतृत्वही नव्हते आणि जनमत वळवू शकेल, अशी एकही संस्था या पक्षाच्या ताब्यात नव्हती व आजही नाही. त्यामुळे पक्षवाढीला मर्यादा आल्या. साखर कारखानदारी दोन्ही काँग्रेसच्या ताब्यात. गावा-गावांतील सेवा संस्था, ग्रामपंचायतींवर आणि ग्रामीण राजकारणावरही काँग्रेसचा प्रभाव, त्यामुळेही ग्रामीण राजकारणात भाजपला चंचुप्रवेशही मिळू शकला नाही. हे चित्र बदलून गडहिंग्लज व आजरा कारखान्यांच्या निवडणुकीत दादांनी ताकद लावली. त्यात त्यांना चांगले यश मिळाले. या निवडणुकीमुळे भाजपला मानणारा गट भक्कम झाला हे नाकारता येत नाही. त्यांची महालक्ष्मी बँकेच्या निवडणुकीतील भूमिका मात्र अचंबित करणारी आहे. भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मानणाऱ्या संस्थेतही दादांनी पाठिंबा दिलेले पॅनेल पराभूत होत असेल तर मग त्यांची रणनीती चुकते की काय, अशी शंका येते.शहरी मध्यमवर्गीय लोकांचा पक्ष’ अशी प्रतिमा पुसून त्याची वाढ गावागावांत करण्याचा दादांचा प्रयत्न आहे. त्याला प्रतिसाद मिळत असला तरी आजही या पक्षाचे अस्तित्व कोल्हापूरसह, इचलकरंजी, गांधीनगर या ठिकाणीच आहे. अन्यत्र हा पक्ष बेदखल आहे. चंद्रकांतदादा पाटील हे ‘पुणे पदवीधर’मधून दोनदा विजयी झाले. त्यात दुसऱ्यांदा विजयी होताना त्यांना बरीच पराकाष्ठा करावी लागली. कोल्हापुरातील पहिले लोकनियुक्त आमदार म्हणून सुरेश हाळवणकर यांचीच नोंद घ्यावी लागेल. ‘कोल्हापूर दक्षिण’मधून आमदार झालेले अमल महाडिक हे जरी भाजपचे असले तरी त्यांचा विजय हा सर्वार्थांनी भाजपचा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंझावातामुळे भाजपला महाराष्ट्रात घवघवीत यश मिळाले, तरी पक्ष म्हणून भाजपची जिल्ह्यातील वाटचाल रोडावलेलीच आहे. महापालिकेच्या राजकारणातही या पक्षाची आतापर्यंतची वाटचाल ही बेदखल अशीच राहिली. प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम न करता सत्ताधारी गटाशी संगनमत करून राजकारण करण्यात या पक्षाने धन्यता मानली; त्यामुळे भाजप म्हणून त्यांचे वेगळे अस्तित्व फारच कमी वेळा उठून दिसले. आपल्या स्वत:च्या ताकदीवर सत्तेत येऊ शकत नाही हे चंद्रकांतदादांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील ताराराणी आघाडीशी युती केली. त्यासाठी पंचवीस वर्षांचा जुना सहकारी शिवसेनेला कट्ट्यावर बसविले. त्यामुळे संख्याबळ वाढले; परंतु सत्ता हस्तगत करता आली नाही. दुसऱ्या बाजूला शहराच्या राजकारणातील शिवसेनेचा विरोध अधिक टोकदार झाला. महापालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाने भाजपसाठी राबलेला कार्यकर्ता, स्वच्छ चारित्र्य या गोष्टी फाट्यावर मारल्या व निवडून येण्याच्या निकषावर कुणालाही उमेदवारी दिली. त्यामुळे सत्तेसाठी भाजपचा राष्ट्रवादी झाल्याचे चित्रही कोल्हापूरने अनुभवले. माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांनी गेल्या दोन-तीन वर्षांत आक्रमकपणे पक्ष विस्तारासाठी प्रयत्न केले; परंतु ते सध्या पक्षात बाजूला पडल्यासारखी स्थिती आहे. आता संदीप देसाई या नव्या तरुणास महानगर जिल्हाध्यक्ष व हिंदुराव शेळके यांना ग्रामीण जिल्हाध्यक्ष करून संघटनात्मक कूस बदलली आहे. शेळके, बाबा देसाई, केरबा चौगले हे संघटना वाढीसाठी गावोगावी फिरत आहेत. त्याचा पक्षाला कितपत फायदा होतो, हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतच दिसेल.--परवाच दादांनी मुश्रीफ यांना तुम्ही आमदार होणार नाही, अशी व्यवस्था केली असल्याचे आव्हान दिले; परंतु त्यातील गंमत अशी आहे की, हे करण्यासाठी दादांकडे त्यांच्या पक्षाचा नेता किंवा उमेदवार नाही. संजय घाटगे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून बार उडवायचा दादांचा प्रयत्न आहे. पक्षाने पहिल्याच दणक्यात थेट कॅबिनेट मंत्रिपद देऊन चंद्रकांतदादा पाटील यांना मोठे बळ दिले आहे; परंतु पाटील यांचा आक्रमक राजकारणाचा पिंड नाही. आता-आता ते जरा मुश्रीफ यांना थेट अंगावर घेऊ लागले आहेत.आता जे लोक भाजपच्या वळचणीला आले आहेत, त्यांना काँग्रेसमध्ये फारसे स्थान नव्हते, असेच बरेचसे आहेत. त्यांत माणिक पाटील-चुयेकर असतील किंवा बाळासाहेब नवणे यांचा उल्लेख करावा लागेल. राष्ट्रवादीचे प्रताप कोंडेकर भाजपवासी झाले आहेत; परंतु ते फारसे सक्रिय नाहीत. चंदगडचे गोपाळराव पाटील हे आता पक्षाच्या रांगेत आहेत; परंतु ते आले तर ताकद मिळण्यापेक्षा पक्षाची बदनामीच जास्त होण्याचा धोका आहे.ावा कार्यकर्ता तयार होत नाही म्हणून इतर पक्षांतील आयात नेते घेण्याकडे सध्या तरी नेतृत्वाचा कल आहे. त्याची सुरुवात विधानसभा निवडणुकीत अमल महाडिक यांच्यापासून झाली आहे.
विश्वास पाटील --उद्याच्या अंकात शिवसेना