इचलकरंजी : कापसाचे कडाडलेले भाव आणि उत्पादित खर्चाप्रमाणे सूत व कापडास बाजारात दर मिळत नसल्याने वस्त्रोद्योगातील सूतगिरण्या व यंत्रमाग कारखानदार दिवसेंदिवस होणाऱ्या नुकसानीमुळे हैराण झाले आहेत. अशा अभूतपूर्व मंदीवर शासनाने गांभीर्याने उपाययोजना करावी. ज्यामुळे वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाच्यावतीने राज्यातील सर्व सूतगिरण्यांच्या संचालकांची बैठक सोमवारी (१८ जुलै) मुंबई येथे आयोजित केली आहे.बैठकीमध्ये कापसाची होत जाणारी प्रचंड भाववाढ, बाजारातील कापसाचा तुटवडा, वाढलेले वीज दर, सुतास मागणी नसणे आणि उत्पादनाप्रमाणे सुतासाठी न मिळणारा दर अशा विषयांवर विचारविनिमय करून पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे, अशी माहिती महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी दिली.अशा प्रकारच्या उद्भवलेल्या परिस्थितीबाबत वस्त्रोद्योग राज्यमंत्री सुभाष देशमुख यांच्याबरोबरसुद्धा चर्चा करून शासनाने वस्त्रोद्योगाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी महासंघाचे एक शिष्टमंडळ लवकरच भेटणार आहे, असेही त्यांनी स्पष्टकेले.गेल्या वर्षभरापासून कापडाला मागणी नसल्यामुळे त्या प्रमाणात सुतास सुद्धा भाव मिळत नाही. अशा स्थितीत १ जुलैपासून कापसाची मोठ्या प्रमाणात भाववाढ सुरू झाली आहे. त्यावेळी ३५ हजार रुपये प्रति खंडी मिळणाऱ्या कापसाचा भाव आता ५१ हजार रुपये झाला आहे. याचा परिणाम सुताच्या दरवाढीमध्ये झाला आहे. मात्र, यंत्रमाग कापडालासुद्धा बाजारात मागणी नसल्यामुळे उत्पादित खर्चाएवढा भाव सुतास मिळत नाही.याचा परिणाम म्हणून सहकार क्षेत्रात २५ हजार चात्यांच्या सूतगिरण्यांना दररोज तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत तोटा सहन करावा लागत आहे. यावर चर्चा करण्यासाठी तासगाव (जि. सांगली) येथे ९ जुलै रोजी रामानंद भारती सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळी पश्चिम महाराष्ट्रातील गिरण्यांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्यातील सर्व सूतगिरण्यांची बैठक महासंघाच्यावतीने मुंबईत बोलविण्याचा निर्णय घेण्यात आला.दरम्यान, गेले महिनाभर स्थानिक सूत बाजारामध्ये सुताचे भाव मोठ्या प्रमाणात वाढू लागले असून, फाईन काऊंट या सूत प्रकारासाठी पाच किलोमागे २०० रुपयांपासून ३०० रुपयांपर्यंत भाववाढ झाली आहे, तर पीव्ही-पीसी या सुतासाठी प्रति किलो दहा ते पंधरा रुपये वाढ झाली. मात्र, सध्याचे चढ्या भावाचे सूत घेऊन उत्पादित झालेल्या कापडासाठी बाजारात मागणी नाही.वाढलेल्या सूत दराच्या प्रमाणात कापडाला प्रतिमीटर किमान दोन रुपये अधिक भाव मिळाला पाहिजे; पण सध्या फक्त ७५ पैसे इतकाच भाव मिळत आहे. यामुळे कापड उत्पादक यंत्रमागधारक आणि कापड व्यापाऱ्यांनासुद्धा नुकसान सोसावे लागत आहे. यावर लवकरच शासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी सांगितली. (प्रतिनिधी)राज्य व केंद्राकडून उपाययोजनेची आवश्यकतायंत्रमागावर उत्पादित कापडाला सध्या प्रति पीक प्रतिमीटर तीन ते साडेतीन पैसे इतकी मजुरी पडत आहे. त्याऐवजी साडेसात पैसे मजुरी मिळणे आवश्यक आहे, तरच राज्यातील यंत्रमाग उद्योग जिवंत राहील, असे सांगून यंत्रमागधारक जागृती संघटनेचे अध्यक्ष विनय महाजन म्हणाले, यावर राज्य शासन आणि केंद्र सरकार यांनी तोडगा काढून यंत्रमागांना नवसंजीवनी द्यावी, अशी मागणी करण्यासाठी आमचे शिष्टमंडळ आमदार सुरेश हाळवणकर व खासदार राजू शेट्टी यांना भेटले आहे. दोघांनीही याचा सकारात्मक विचार करून यंत्रमागधारकांची बाजू शासन दरबारी मांडण्याची ग्वाही दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
कापसाच्या दरवाढीमुळे यंत्रमाग उद्योग नुकसानीत
By admin | Published: July 17, 2016 12:59 AM