कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना देण्यात येणारा लाडू प्रसाद आता सोमवारपासून (दि. १६) नियमितपणे मिळणार आहे. यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने लाडूची आॅर्डर कारागृह प्रशासनाकडे शुक्रवारी नोंदविली. गेले काही महिने अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यांतून आलेल्या भाविकांना लाडू प्रसाद नियमितपणे मिळत नव्हता. त्यात अनेकदा निविदा काढण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी लागत असल्याने पूर्वीच्याच ठेकेदाराकडे लाडू प्रसाद पुरविण्याचे कंत्राट देण्यात आले. तरीही भाविकांना निर्जंतूक व व्यवस्थित असा लाडू प्रसाद काही केल्या मिळेना. याबाबतच्या तक्रारी भाविकांकडून वारंवार होत राहिल्याने देवस्थान समितीच्या बैठकीत हा प्रसाद नियमित पुरविण्यासाठी कळंबा कारागृहातील कैद्यांनी तयार केलेला लाडू प्रसाद घेण्याचे ठरविण्यात आले. याबाबत समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. अमितकुमार सैनी यांनी कारागृह प्रशासनाकडे लाडू पुरविण्याबाबत विचारणा केली. त्यानुसार कारागृह प्रशासनाकडूनही सकारात्मक प्रतिसाद आला. याबाबत समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत लाडू प्रसाद पुरविण्यासाठी कारागृहाच्या प्रशासनाकडे मागणी नोंदविण्यात आली. त्यानुसार कारागृह प्रशासन आता सोमवार (दि. १६) पासून देवस्थान समितीकडे मागणीप्रमाणे लाडू प्रसाद पॅकिंगसह सात रुपये प्रतिनग इतक्या दराने पुरविणार आहे; तर देवस्थान आठ रुपये प्रतिनग याप्रमाणे भक्तांना हा प्रसाद विकणार आहे. यापूर्वी हा लाडू प्रसाद पाच रुपये प्रतिनगाप्रमाणे मिळत होता. आता यात तीन रुपयांची वाढ झाली आहे.
सोमवारपासून भक्तांना लाडू प्रसाद
By admin | Published: May 14, 2016 1:48 AM