आॅनलाईन लोकमत/विश्वास पाटील
कोल्हापूर, दि. २४ : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदावरील व्यक्तीची नियुक्ती करण्यास राज्य शासनाला मुहूर्त लागेना झाला आहे. अंबाबाई मंदिरातील ‘पुजारी हटाओ आंदोलन’ हे एक त्याचे महत्त्वाचे कारण असल्याचे चित्र पुढे आले आहे.
पंढरपूरपाठोपाठ मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टच्या अध्यक्षपदी शिवसेना नेते आदेश बांदेकर यांची नियुक्ती झाली आहे; परंतु पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर अध्यक्ष नक्की कधी नियुक्त होणार, अशी विचारणा होत आहे. हा विलंब राज्य सरकारकडून होत आहे की पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून हेच कोडे उलगडेना झाले आहे. या पदावर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांचे नाव निश्चित झाले आहे. स्वत: पालकमंत्र्यांनी त्यास एप्रिलमध्येच दुजोरा दिला आहे; परंतु जाधव यांच्या नियुक्तीचा प्रत्यक्षात आदेश निघण्यात विलंब होत आहे. या समितीचे सध्या जिल्हाधिकारी प्रभारी अध्यक्ष आहेत.
कोल्हापूर, सांगली व सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या समितीकडे ३६३४ देवस्थानांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. याशिवाय देवस्थानांकडे सुमारे साडेदहा हजार हेक्टर जमीन असून देवस्थानचे वार्षिक उत्पन्न कोट्यवधी रुपयांचे आहे. मुख्यत: अंबाबाई मंदिर व जोतिबा मंदिराचे व्यवस्थापन या समितीकडे आहे. काँग्रेसच्या काळात गुलाबराव घोरपडे यांची मुदत दि. १४ जून २०१० ला संपल्यानंतर हे पद द्यायचे कुणाला, याचा निर्णयच त्या पक्षाने घेतला नाही; त्यामुळे त्यांची सत्ता गेली तरी पद रिक्तच राहिले. पुढे राज्यात सत्तांतर झाले; परंतु भाजपलाही या पदासाठी सक्षम माणूस मिळाला नाही म्हणजे गेली सात वर्षे हे पद रिक्त आहे. मोठा आर्थिक व्यवहार, कायदेशीर बाबी असल्यामुळे ‘अभ्यासू व्यक्ती’ या पदावर नियुक्त केली जावी, असा प्रयत्न असतो. त्या चौकटीत बसणारे नेतृत्वच आजच्याघडीला भाजपकडे नाही.
समरजित घाटगे यांना ‘म्हाडा’चे अध्यक्षपद दिले. पंढरपूरचे अध्यक्षपद बाहेरून पक्षात आलेल्या अतुल भोसले यांना दिले. त्यामुळे हे एकच महत्त्वाचे मंडळ राहिले असून किमान तिथे तरी पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी दिली जावी, असा आग्रह पक्षातूनच झाला. त्यामुळे पालकमंत्री पाटील यांनी महेश जाधव यांचे नांव निश्चित केले. त्यांच्या नावास पक्षातील काहींनी विरोध केला असला तरी ‘दादां’नीच हे नाव निश्चित केले असल्यामुळे अडचण नव्हती. त्यानुसार जाधव यांची कागदपत्रेही विधि व न्यायखात्याकडे गेली आहेत. आठवड्याभरात निर्णय होणार असे एप्रिलपासून सांगण्यात येत आहे. सध्या कोल्हापुरात ‘अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ’ आंदोलन सुरू आहे. हा विषय संवेदनशील झाला आहे. त्याच्या सुनावण्या जिल्हाधिकाऱ्यांसमोर सुरू आहेत व स्वत: जिल्हाधिकारीच या समितीचे सध्या प्रभारी अध्यक्ष आहेत.
पालकमंत्री पाटील यांचा सरकारदरबारी एवढा दबदबा आहे की त्यांनी मनात आणले तर ते या आदेशावर मुख्यमंत्र्यांची चुटकीसरशी सही घेऊ शकतात. शेवटी पक्षातीलच कार्यकर्त्याला ही संधी द्यायची असल्यामुळे मुख्यमंत्र्यांचाही त्यावर काही आक्षेप असण्याचे कारण नाही; परंतु तरीही ही नियुक्ती लोंबकळत पडली आहे. पालकमंत्री पाटील यांना जाधव यांच्या नियुक्तीबद्दल काही आक्षेप आहेत म्हणून त्यास विलंब लागत आहे की अन्य कोणते कारण आहे याचा उलगडा होत नाही. पालकमंत्र्यांशी संपर्क साधल्यावर ते आठवड्याभरात आदेश काढणार असल्याचे सांगत आहेतपरंतु आदेश काही निघत नाही.
खरे कारण असे..
जाधव यांचे पूर्वीपासूनच अंबाबाई मंदिर ‘देवस्थान’शी संबंध आहेत. ‘पुजारी हटाओ’ आंदोलनात देवस्थान समितीने थेट पुजाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. अंबाबाई मंदिराची मालकी आजही ‘देवस्थान’कडेच असल्याचा दावा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्यासमोरील सुनावणीवेळी कागदपत्रांसह केला आहे. श्रीपूजक हा वर्ग भाजपचा पारंपरिक मतदार आहे. त्यामुळे हा संवेदनशील विषय सुरू असताना ‘देवस्थान’ला अध्यक्ष नियुक्त करून जखमेवर मीठ चोळल्यासारखे होऊ नये यासाठीच ही नियुक्ती लांबणीवर टाकली जात असल्याचे जबाबदार सूत्रांचे म्हणणे आहे.