सांगली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात टंकलिपिक या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दहा ते बारा सुशिक्षित बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार आज, रविवारी उघडकीस आला. याप्रकरणी फसगत झालेल्या तरुणांनी विजय हणमंत जाधव (रा. हरिमणी अपार्टमेंट, सिटी हायस्कूल रस्ता, गावभाग, सांगली) व स्मिता चंद्रकांत कन्नुरे (औरवाड फाटा, नृसिंहवाडी, ता. शिरोळ) या दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. संशयितांनी तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची स्वाक्षरी व भारतीय राजमुद्रा असलेले नियुक्तीपत्रही या तरुणांना दिले असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फसगत झालेल्यांमध्ये सांगली, इस्लामपूर व मिरजेतील बेरोजगार तरुणांचा समावेश आहे. यातील मारुती सनकाप्पा शिंदे (रा. नवीन रेल्वे स्टेशनजवळ, सांगली) या तरुणाने पोलिसांत तक्रार दिली आहे. संशयित जाधव व स्मिता कन्नुरे या दोघांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात टंकलिपिक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखविले. या कामासाठी प्रत्येकाकडून त्यांनी एक लाख ४० हजार रुपये घेतले. त्यानंतर तत्कालीन अध्यक्ष जिल्हा निवड समिती दीपेंद्रसिंह कुशवाह यांची स्वाक्षरी व भारतीय राजमुद्रा असलेले नियुक्तीपत्र या तरुणांना दिले आहे. पत्रात म्हटले आहे की, ‘शासन परिपत्रक खुल्या अनुशेष भरतीनुुसार आपली लिपिक-टंकलेखक या पदावर कायमस्वरुपी जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्ती करण्यात येत आहे’. पत्र घेऊन तरुण जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. मात्र, हे पत्र आमचे नसल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. तरुणांनी जाधवला जाब विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र तो गायब झाला आहे. आमच्याकडून घेतलेली रक्कम चैनी व सोने खरेदी करण्यासाठी वापरल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्याच्याविरुद्ध जत पोलिसांत काही गंभीर गुन्हे नोंद आहेत. अपार्टमेंटमध्ये छापासहायक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे यांनी जाधवच्या शोधासाठी तो राहात असलेल्या गावभागातील हरिमणी अपार्टमेंटमध्ये छापा टाकला. मात्र तो सापडला नाही. महिन्याभरापासून तो गायब असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. तो मूळचा कर्नाटकातील असल्याने पोलिसांचे एक पथक कर्नाटकात रवाना करण्यात आले आहे.
नोकरीच्या आमिषाने भामट्यांकडून लाखोंचा गंडा
By admin | Published: February 09, 2015 1:00 AM