कोल्हापूर : सर्वसामान्य, गरीब जनतेला चांगल्या वैद्यकीय सुविधा तसेच कोरोना प्रतिबंधात्मक लस सहज उपलब्ध व्हावी या हेतूने येथील परमधाम सेवा संस्थेच्यावतीने गुरुवारी महापालिकेला एक लाख अकरा हजार रुपयांचा निधी दिला. निधीचा धनादेश प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी स्वीकारला.
महानगरपालिकेने स्वत: लस खरेदी करून सामान्य जनतेचे लसीकरण करावे या हेतूने संस्थेतर्फे हा निधी देण्यात येत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आणि या निधीतून केवळ लसच खरेदी करावी, असा आग्रह संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वडणगेकर यांनी धरला. तेव्हा लस खरेदी करण्याची प्रक्रिया ही केंद्र व राज्य सरकारच्या अधिकारातील असल्यामुळे महानगरपालिकेला स्वत: लस विकत घेता येत नाही. तेव्हा तुमचा निधी आम्ही स्वीकारू शकणार नाही. जर मदत द्यायचीच असेल तर वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी म्हणून द्या, असे आवाहन प्रशासक बलकवडे यांनी केले.
सुमारे दीड तास संस्थेचे पदाधिकारी लस खरेदीसाठीच निधी स्वीकारा तसेच महापालिकेने लसीकरण फंडासाठी बँक खाते उघडून त्याचा क्रमांक जाहीर करा, असा आग्रह धरून बसले. बराच समजावण्याचा प्रयत्न झाल्यानंतर संस्थेने वैद्यकीय साहित्य खरेदीकरीता म्हणून एक लाख अकरा हजाराचा धनादेश दिला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष वडणगेकर, तानाजी पाडळकर, सोपानराव वडगावकर, सचिन हिलगे, गजानन लिंगम, राजाराम जाधव उपस्थित होते.