लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) व दि. न्यू इंडिया एन्शोरन्स कंपनी यांच्यावतीने बँकेकडून कर्ज घेतलेल्या दुभत्या जनावरांसाठी प्रत्येक एक लाखाचा विमा उतरवणार आहे. त्यासाठी २२५० रुपये विमा हप्ता असून, यातील १६८८ रुपये उत्पादकाचे, ४५० रुपये संघाचे, तर ११२ रुपये दूध संस्थेचा हिस्सा राहील, अशी घोषणा संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केली.
‘गोकुळ’ दूध संघाची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयात ऑनलाईन झाली. त्यामध्ये ते बोलत होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील हे प्रमुख उपस्थित होते.
अध्यक्ष पाटील म्हणाले, संघाची वार्षिक उलाढाल २५५१ कोटी इतकी असून, विविध अनुदानापोटी २८ कोटी ७८ लाख रुपये उत्पादकांना दिले आहेत. सभासद भविष्य कल्याण निधीसह इतर सभासदांभिमुख योजना राबवत असताना दूध संकलनात वाढ करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. संकलनात वाढ करत असताना दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या मार्केटिंगकडेही अधिक लक्ष देणार आहे. सध्या टेट्रापॅकमधील दुधास मुंबई, ठाणे, पालघर येथे मागणी अधिक असून, नजीकच्या काळात लस्सी, सुगंधी दूध, ताक टेट्रापॅकमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे.
‘गोकुळ’चे शिल्पकार आनंदराव पाटील-चुयेकर यांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष झाला असून, याचे संपूर्ण श्रेय पाटील-चुयेकर यांना जाते. ‘आनंद’गुजरातमध्ये गेल्यानंतर तिथे त्यांच्या संस्थापकांची चित्रफित पाहिली, त्याचप्रमाणे पाटील-चुयेकर यांची चित्रफित करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतल्याचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले. अहवाल वाचन कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी केले. मागील प्रोसिडिंगचे वाचन बोर्ड सचिव एस. एम. पाटील यांनी केले. संचालक अरुण डोंगळे यांनी आभार मानले. उत्तमप्रतीचा व जास्तीत-जास्त दूध पुरवठा करणाऱ्या संस्था प्रतिनिधींचा सत्कार यावेळी करण्यात आला.
(जोड देत आहे........)