- संतोष बामणे (उदगाव, कोल्हापूर)
ऊसाचा पट्टा म्हणून ओळख असलेल्या ‘कृष्णा’ काठावरील शेतकरी आता ताजा पैसा देणाऱ्या पिकांकडे वळला आहे. उसाबरोबर भाजीपाला लागवड येथे मोठ्या प्रमाणात होते. चिंचवाड (ता. शिरोळ) येथील पदश्री बबन माजगावे या महिलेने ऊस व भाजीपाल्याला बगल देत ‘आळू’ची शेती करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांनी पाच गुंठ्यांत ‘कोकणी’ आळूची लागवड करून लाखाचे उत्पन्न काढले.
शिरोळ तालुक्यातील कसदार जमिनीत ऊस व भाजीपाला मोठ्या प्रमाणात घेतला जातो. उसाचा उत्पादन खर्च आणि पंधरा-सोळा महिन्यांनी मिळणाऱ्या पैशातून संसाराचा गाडा चालवणे तसे मुश्कील असते. येथील शेतकरी प्रयोगशील आहेत, ते पारंपरिक शेतीच्या मागे न लागता नवीन तंत्रज्ञानाबरोबरच बाजाराचा अंदाज घेऊन पिके घेतात. त्यातूनच पदश्री माजगावे यांनी ‘कोकणी आळू’च्या पानाची लागवड केली. संपूर्ण लागवड सेंद्रिय पद्धतीने पाच गुंठ्यांत सरी पद्धतीने ‘कोकणी’ आळू पानाची लागवड केली. गीर व देशी गायीचे शेणखत, गोमूत्राची फवारणी नियमित केली.
तीन-चार दिवसांनी ‘आळू’ला पाणी देत असताना पंधरा दिवसांनी ताक व गाय दुधाची आळवणी दिली. कसदार जमीन आणि त्याला पोषक असे सेंद्रिय खत मिळाल्याने ‘आळू’ची वाढ जोमात झाली. हिरव्यागार आळूच्या पानाची तोडणी रोज करावी लागते. मिरज, सांगली, जयसिंगपूर येथील बाजारात या ‘कोकणी आळू’च्या पानाला खूप मागणी असून, दोन रुपये पान दर मिळत आहे. आळूची वडी, फतफते (गरगटे), भजी करण्यासाठी ‘आळू’ला चांगली मागणी आहे.
बाजारात गेल्यानंतर ‘आळू’ खरेदीसाठी झुंबड उडत असल्याने तासाभरात विक्री करून पुन्हा शेतातील कामासाठी येता येते. पानाला दर चांगला मिळत आहे. आळूची वडी, फतफते (गरगटा), भजी करण्यासाठी बाजारपेठेत माजगावे यांच्या आळूच्या पानांना चांगली मागणी असल्याने नफाही चांगला मिळतो. पारंपरिक भाजीपाला उत्पादन केल्यानंतर त्याला दर मिळेल का? याची खात्री शेतकऱ्यांना नसते; पण पदश्री माजगावे यांनी बाजारपेठेचा अंदाज घेऊन आळू लागवडीचे धाडस केले आणि चांगला पैसा मिळाला.
शेतीत बाजारपेठेतील मागणी पाहूनच आपण बदल केले, तरच किफायतशीर शेती करता येईल. यासाठी आम्ही ‘कोकणी आळू’ची लागवड केली. त्यातून आम्हाला एक लाखापेक्षा अधिक उत्पादन मिळाल्याचे पदश्री माजगावे यांनी सांगितले. विदर्भाच्या काही भागात तसेच मराठवाड्यात आळूला चमकुरा या नावाने ओळखले जाते़ कोकणात आळूचे फदफदे या नावाने भाजी केली जाते़ त्याची पाने व कंद खाण्याजोगे असतात़ रक्त वाढविणारी, ताकद वाढविणारी व मलप्रवृत्तीस आळा घालणारी म्हणून आळूकडे पाहिल्या जाते़ याशिवाय पित्तावरही उत्तम गुण देते़