कोल्हापूर : महाराष्ट्र सरकारने नव्याने स्थापन केलेल्या जैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांची निवड करण्यात आली.जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ललित गांधी यांची गेल्या अकरा वर्षांत देशभर केलेल्या कामाची दाखल घेऊन सरकारने ही निवड केली आहे. या महामंडळाचे मुख्यालय, मुंबई येथे राहणार असून प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र कार्यालय कार्यरत राहणार आहे. राज्यातील जैन समाजाच्या कल्याण व विकासासाठी काम करणे व त्यांचे सामाजिक सक्षमीकरण करणे. समाजाच्या व्यक्तींना अल्प व्याजदराने स्वयंरोजगाराकरिता कर्ज उपलब्ध करुन देणे, त्याची वसूली करणे, जैन समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पतसाधने, साधनसामग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरविणे, समाजासाठी आवश्यक साहित्य आणि सामग्री यांची निर्मिती, जुळवणी व पुरवठा यांसाठी सेवा देणे, समाजाच्या कल्याणासाठी योजना सुरू करणे आणि त्यांना चालना देणे हा महामंडळाचा उद्देश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले वचन पूर्ण केल्याबद्दल गांधी यांनी त्यांचे आभार मानले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री मंगलप्रभात लोढा, नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धैर्यशील माने, ‘मित्रा’चे उपाध्यक्ष अजय आशर यांचे सहकार्य लाभले असून, समाजाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करू, असे ललित गांधी यांनी सांगितले. गांधी यांच्या निवडीने राज्यमंत्री दर्जाचे अध्यक्षपद मिळाल्याने जैन समाजात आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
जैन अल्पसंख्यक महामंडळाच्या अध्यक्षपदी ललित गांधी; पहिल्या अध्यक्षपदाचा मान कोल्हापूरला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 5:15 PM