कोल्हापूर : रस्त्याकडेला उभ्या केलेल्या मोटारीतून सुमारे सव्वा लाखांची रोकड असणारी बॅग अज्ञाताने लंपास केल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी सायंकाळी सम्राट नगरातील श्री भगवान महावीर मानव सेवा उपचार केंद्रासमोर घडली. याबाबत डॉ. प्रभा अक्षय बाफना (वय ३५, रा. पुण्यपर्व अपार्टमेंट, ॲपल-सरस्वती हॉस्पिटलमागे, कदमवाडी) यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बाफना ह्या व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांनी शनिवारी सायंकाळी पावणेसात ते साडेसात या दरम्यान आपली मोटारकार ही सम्राट नगरातील जिवनेश्वर भवन परिसरातील श्री भगवान महावीर मानव सेवा उपचार केंद्रासमोर रस्त्यावर उभी करुन त्या रुग्णालयात गेल्या होत्या. यानंतर अवघ्या पाऊण तासात काम आटोपून त्या मोटारीकडे परतल्या. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या मोटारीतील सव्वा लाखांची रोकड असणारी हॅंडबॅग लंपास केल्याचे लक्षात आले. त्या बॅगमध्ये रोख रकमेसह बॅंकेतील लॉकरची चावी, घरची चावी, डेबिट कार्ड, एटीएम कार्ड, वाहनचालक परवाना आदी साहित्य होते. या चोरीची तक्रार डॉ. प्रभा बाफना यांनी रात्री उशिरा राजारामपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.