शिरगाव : शिरगाव ( ता. राधानगरी ) येथील एका घरातील पाच तोळ्यांचा ऐवज (अंदाजे किंमत दोन-अडीच लाख रुपये) व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याने गावात खळबळ उडाली आहे. याबाबतची फिर्याद रात्री उशिरा विक्रम तानाजी कलिकते यांनी राधानगरी पोलिसात दिली आहे. येथील कलिकते गल्लीतील विक्रम कलिकते यांच्या पत्नी अश्विनी कलिकते यांनी मंगळवार, दि. २९ रोजी सायंकाळी आपल्या घरातील सोप्यात मोठ्या बॅगेतील लहान पर्समध्ये अडीच तोळ्यांचा लक्ष्मीहार, अडीच तोळ्यांचे गंथन, अर्धा तोळ्यांचे टॉप्स व रोख अकराशे रूपये असे साहित्य ठेवले होते. यादरम्यान त्या घरात जेवण करायला पाठीमागील बाजूस गेल्या तर त्यांच्या सासुबाई गावातील नातेवाईकांच्या घरी गेल्या होत्या. दरम्यान, बुधवारी सकाळी दहा-साडेदहा वाजता गॅस सिलिंडरसाठी अश्विनी या आपल्या बॅगमध्ये ठेवलेल्या पर्समधील पैसे काढण्यासाठी गेल्या. यावेळी त्यांनी बॅग उघडली असता, त्यामध्ये लहान पर्स नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी आपले पती विक्रम यांना याबाबत माहिती दिली. दोघी सासू-सुनांनी घरामध्ये सगळीकडे बघितले. परंतु संबंधित पर्स मिळाली नाही. या घटनेमुळे त्या घाबरून गेल्या. विक्रम कामावरून घरी आल्यावर रात्री उशिरा त्यांनी याबाबतची फिर्याद राधानगरी पोलिसात दिली आहे. या घटनेमुळे शिरगावमध्ये खळबळ माजली असून, गावात भीतीचे वातावरण आहे. घरातून ऐवज लंपास करण्यांची गावातील ही पहिलीच घटना असून, एखाद्या माहितगाराकडूनच ही चोरी झाली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिरगाव येथील एका कुटुंबातील पाच तोळ्यांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 4:26 AM