कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांना तवंदी घाट परिसरातील जमीन उद्योग विस्तारीकरणासाठी देण्यावर कर्नाटक सरकारने बुधवारी शिक्कामोर्तब केले. या उद्योजकांना एकूण ८०० एकर जमीन देण्याची या सरकारने तयारी दर्शविली आहे. या ठिकाणी १ जूनपासून पायाभूत सुविधांच्या उभारणीस प्रारंभ केला जाणार असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले आहे, अशी माहिती गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे (गोशिमा)चे माजी अध्यक्ष उदय दुधाणे यांनी दिली. वाढते वीजदर आणि पायाभूत सुविधांची कमतरता हे चित्र बदलण्याची मागणी राज्य सरकारकडे मोर्चा, निवेदने आणि चर्चा, आदींच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांनी केली. मात्र, याबाबत सरकारकडून सकारात्मक स्वरूपात काहीच झाले नाही. अखेर कोल्हापूरमधील उद्योजकांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांनी कर्नाटकामध्ये स्थलांतरण व विस्तारीकरणाचा निर्णय घेतला. त्यांना कर्नाटक सरकारने तवंदी घाट परिसरात जागा देण्याची तयारी दाखवीत सकारात्मक प्रतिसाद दिला. यापुढील पाऊल टाकण्यासाठी कर्नाटक सरकारने चर्चा करण्यासाठी ‘गोशिमा’ कार्यालयात मंगळवारी (दि. २) दूरध्वनी करून शिष्टमंडळाला पाठवावे असे सांगितले. त्यानुसार ‘गोशिमा’चे माजी अध्यक्ष उदय दुधाणे, आर. पी. पाटील आणि माजी उपाध्यक्ष संजय उरमनट्टी हे चर्चेसाठी बुधवारी बंगलोरला रवाना झाले. येथील पॅलेस ग्राउंड या ठिकाणी आयोजित ‘इन्व्हेस्ट कर्नाटक २०१६’ या उद्योग मेळाव्यांतर्गत दुपारी साडेचार वाजता पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांचे शिष्टमंडळ व कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उद्योगमंत्री आर. व्ही. देशपांडे व प्रधान सचिव रत्नप्रभा यांची चर्चा झाली. यात तवंदी घाटाच्या परिसरातील ८०० एकर जमीन पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजकांना देण्यावर शिक्कामोर्तब केले. उद्योग विस्तारीकरण केल्या जाणाऱ्या संबंधित परिसरात पायाभूत सुविधांची उभारणी १ जूनपासून करण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी) स्वस्त वीज, करात सवलत पश्चिम महाराष्ट्रातून उद्योगांच्या विस्तारीकरणासाठी कर्नाटकात येणाऱ्या उद्योजकांना महाराष्ट्रापेक्षा कमी दरात वीज आणि करांमध्ये सवलत दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली. ‘इन्व्हेस्ट इन कर्नाटक’ या योजनेअंतर्गत कर्नाटक सरकारकडून तवंदी घाट परिसरातील जागा उद्योग क्षेत्र म्हणून विकसित केली जाणार आहे. गेल्या दीड वर्षापासून कर्नाटक सरकारकडे आमचा पाठपुरावा सुरू होता. आम्हा सर्व उद्योजकांच्या सामूहिक प्रयत्नांना यश मिळाले आहे, असे दुधाणे यांनी सांगितले. सोळाशे जणांचे अर्ज जागेसाठी कर्नाटक सरकारने प्रस्ताव मागितल्यानंतर कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील १६०० जणांनी ‘गोशिमा’कडे अर्ज दाखल केले. यांतील ४०० जणांचे अर्ज ‘गोशिमा’ने कर्नाटक सरकारला पाठविले आहेत. त्यांच्याकडून येणाऱ्या सूचनांनुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे दुधाणे यांनी सांगितले.
निपाणीजवळ उद्योगांना जमीन
By admin | Published: February 04, 2016 1:16 AM