कोल्हापूर : आठ मृत व्यक्तिच्या नावे बनावट स्वाक्षरी करुन वटमुख्यात्यार करुन कळंबा तर्फे ठाणे येथील जमीन हडप करुन महापालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी संशयित गुंडू अर्जुना पाटील (वय ६७ रा. बी वॉर्ड, संभाजीनगर) याच्यावर गुन्हा दाखल झाला. महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता रमेश सदाशिव काबंळे (रा. साई कॉलनी, आपटेनगर) यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली. हा प्रकार २० जानेवारी २००० ते २००६ या कालावधीत घडला.लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित पाटील याने महापालिका हद्दीतील कळंबा तर्फे ठाणे येथील रिव्हिजन सर्वे क्रमांक २९८-३ ही मिळकत १५६ जणांच्या नावावर आहे. २० जानेवारी २००१ मध्ये नोटरी वकील एस. जोशी यांच्याकडून वटमुखत्यार दस्त करुन घेतला. या दस्तात लिहून देणार म्हणून गणपती पाटील (रा. म्हालसवडे, ता. करवीर) सावित्रीबाई पाटील, अनुसया काजवे (रा. भाटणवाडी, ता. करवीर), राऊ पाटील (रा. हासूरदुमाला, ता. करवीर), आनंदराव कलिकते (रा. शिरगाव, ता. राधानगरी), सुभाष पाटील (रा. म्हालसवडे, ता. करवीर), रंगराव पाटील (रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी), ईश्वरा पाटील (रा. आणाजे, ता. राधानगरी) यांच्या नावे करण्यात आले.
मात्र हे आठजण २० जानेवारी २००१ पूर्वी मृत झाले आहेत. दस्तात त्यांची नावे लिहून त्यांच्यासमोर खोट्या स्वाक्षरी केल्याचे स्पष्ट झाले. त्यासह सदाशिव हरी हुजरे (रा. शिरगाव) यांचीही खोटी स्वाक्षरी करुन बनावट वटमुख्यत्यारपत्र तयार करुन घेतले. ही सर्व कागदपत्रे २००६ मध्ये महानगरपालिकेच्या शिवाजी मार्केट येथील नगररचना कार्यालयाकडे जमा केली होती. त्यानंतर हा भूखंड विकसित केला. १२ एप्रिल २००६ रोजी रेखांकन मंजुरीही घेऊन मनपाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. पोलीस निरीक्षक वसंत बाबर तपास करीत आहेत.