लोकमत न्यूज नेटवर्क
महेश आठल्ये
म्हासुर्ली : जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र अतिवृष्टी झाली. धामणी खोरेही त्याला अपवाद नव्हते. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने सह्याद्री डोंगररांगांच्या कडेकपारीत वसलेल्या धामणी खोऱ्यातील अनेक डोंगर खचून शेतीचे प्रचंड नुकसान झाले. त्याचबरोबर कोनोली - कुपलेवाडी (ता. राधानगरी) येथील दोन नागरिकांना जीवही गमवावा लागला. मानवाच्या गेल्या कित्येक पिढ्यांपासून या डोंगरांनी अन्न, वस्त्र, निवारा, पाणी आदी मूलभूत गरजा भागवून पोशिंद्याची भूमिका निभावली. मात्र, हेच डोंगर आता मानवी हस्तक्षेपामुळे जणू काळ बनू पाहत आहेत. त्याविषयी दोन भागांची ‘पोशिंदा बनतोय काळ’ या नावाने लेखमाला प्रसिद्ध करत आहोत.
गत महिनाअखेरीस झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने धामणी खोऱ्यातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून, डोंगरावरील दगड-माती पाण्याबरोबर खाली वाहत येऊन शेकडो एकर जमीन नापीक झाली आहे. सरकारी यंत्रणेबरोबरच खासगी शेत जमीन मालकांनी निसर्गावर मोठ्या प्रमाणावर केलेल्या अत्याचाराचे हे द्योतक असून, शासनाने एखाद्या तज्ञ समितीकडून या परिसराचे परीक्षण करून यामागच्या नेमक्या कारणांचा ‘पोल खोल’ करावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींमधून होत आहे.
तीन तालुक्यांत विभागलेला तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असणारा सुमारे ४० ते ४५ किलोमीटर लांबीच्या दोन्ही बाजूंनी डोंगररांगा आणि मध्य भागातून वाहणारी धामणी नदी असा धामणी खोऱ्याचा एकंदरीत पसारा आहे. याच डोंगररांगांच्या कडेकपारीत अनेक गावे वसली असून, पाऊसमानही मुबलक आहे. गेल्या कित्येक पिढ्या याच डोंगर कडेकपारीत शेती, फळे, कंदमुळे यावर उदरनिर्वाह करून जगल्या आहेत. भौतिक जगातील सुखसोयींपासून लांब असणाऱ्या, स्वच्छ सुंदर हवा, पाणी आणि अद्भुत निसर्गाच्या सानिध्यामुळे अनेकांना या खोऱ्याने कायमस्वरूपी भुरळ घातली आहे. त्याचाच परिणाम म्हणजे अनेक राजकीय, सामाजिक, सरकारी सेवेतील धनदांडग्यांनी मोठ्या प्रमाणावर अल्प किमतीत जमिनी खरेदी केल्या आहेत. या शेतमालकांनी शेतीच्या विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर अवैध जंगलतोड, जमिनीचे सपाटीकरण, तळी खोदणे, वन्यप्राण्यांच्या प्रतिबंधासाठी चर खोदणे आदी प्रकारे निसर्गावर मनमानी अत्याचार करून त्याला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे.
याबरोबर सरकारी यंत्रणांमधील वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग आदी विभागांनी मोठ्या प्रमाणावर या परिसरातील जमिनीचा अभ्यास न करताच वनतळी बांधणे, बंधारे, नालाबांध बांधणे, बेसुमार वृक्षतोडीकडे दुर्लक्ष करणे, विनापरवाना सुरुंग लावून मोठ्या प्रमाणावर दगडाचे उत्खनन करणे, चर खोदाई करणे, समतल चर खोदून जमिनीत पाणी मुरविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेच्या माध्यमातून जमिनीचे सपाटीकरण करणे आदी प्रकारांमुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डोंगरांना मोठमोठ्या भेगा जाऊन भूस्खलनासारखे प्रकोप झाले आहेत.
..........
कोट....
संपूर्ण धामणी खोरे उंच डोंगररांगेच्या खालच्या बाजूला वसले आहे.
डोंगरमाथ्यावरच्या जमिनी स्थानिकांनी अत्यल्प किमतीत धनवानांना विकल्या आहेत. त्यामुळे विकत घेतलेले संपूर्ण पठार विकासाच्या नावाखाली अक्षरश: पोखरले आहे. सरकारी यंत्रणांनी केलेले अनेक प्रयोगही फसले आहेत.
त्यात वन विभागाने रानतळी निर्माण केली आहेत. प्रचंड अनैसर्गिक वृक्षतोड आणि इतर असंख्य जंगलावर केलेले आघात आदी नानाविध कारणांमुळे नैसर्गिक पावसाच्या पाण्याचा होणारा निचरा थांबला. यामुळे भूस्खलनासारखे प्रकार घडले आणि याला मानवी हस्तक्षेप हेच कारण आहे.
- सुरेश बोरवणकर
ग्रामपंचायत सदस्य, आंबर्डे, ता. पन्हाळा
फोटो ओळी
म्हासुर्ली - बाजारीवाडा येथे कोसळलेला डोंगर आणि भात झालेले नुकसान.