शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) परिसरातील अनेक डोंगरांचे भूस्खलन झाल्यामुळे डोंगरालगत असणाऱ्या शेतशिवारातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
शित्तूर-वारुण परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे कांडवण, खेडे, पार्टेवाडी, शिराळे-वारुण, शित्तूर-वारुण, भिसेवाडी अशा अनेक ठिकाणी डोंगरांचे भूस्खलन झाले. यावेळी डोंगररांगा तुटून झाडाझुडपांसह दगड, मातीचे ढिगारे थेट शेतशिवारात वाहत आल्यामुळे नुकत्याच लावलेल्या भाताच्या रोपा मातीच्या ढिगाऱ्याखाली गडप झाल्या. अनेक शेतींचे बांध वाहून गेले. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
महसूल व कृषी विभागाने नुकसानग्रस्त शेतीचे त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
फोटो :
शित्तूर-वारुण (ता. शाहूवाडी) परिसरातील मोंड्याचे टेक ते पोळाची डाग अशी डोंगररांग तुटून ती थेट भातशेतीत वाहून आली आहे. (छाया : सतीश नांगरे)