लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनासारख्या जागतिक संकटाचा सामना केल्यानंतर आलेल्या नववर्षाची सुरुवात नागरिकांनी शुक्रवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाने केली. तब्बल १० महिन्यांनी उघडलेल्या महाद्वारामधून स्थानिक भाविकांनी देवीच्या मुखदर्शनाचा लाभ घेतला. सकाळी सहा वाजल्यापासून मुखदर्शन आणि मुख्य दर्शनरांगा स्थानिक आणि परगावच्या भाविकांच्या गर्दीने फुलून गेल्या होत्या.
सध्या मंदिराचे दोनच दरवाजे उघडे आहेत. मात्र स्थानिक भाविकांना महाद्वारातून देवीचे मुखदर्शन घेण्याची सवय आहे. शिवाय ज्यांना रांगांमध्ये थांबण्याची इच्छा नाही, त्या भाविकांना बाहेरून दर्शन घेता यावे यासाठी शुक्रवारपासून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने महाद्वार खुले केले. समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी महाद्वाराचे कुलूप काढले. यावेळी कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्य राजू जाधव, सचिव विजय पोवार उपस्थित होते. येथून मंदिरात प्रवेश करून भाविक कासव चौक व गणपती चौकातून देवीचे मुखदर्शन घेऊन बाहेर पडत होते.
दुसरीकडे, पूर्व दरवाजा येथील मुख्य दर्शनरांगाही ओसंडून वाहत होत्या. भाविक ठरावीक अंतर सोडून रांगेत उभे होते. मास्कचा वापर सर्वांना बंधनकारक होता. मंदिराच्या अंतर्गत परिसरातील दुकाने गेल्या १० महिन्यांपासून बंद होती. ही दुकानेही शुक्रवारपासून सुरू झाल्याने व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला.
---
फोटो नं ०१०१२०२१-कोल-अंबाबाई०१
ओळ : कोरोनासारख्या जागतिक संकटाचा सामना केल्यानंतर आलेल्या नववर्षाची सुरुवात नागरिकांनी शुक्रवारी कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाने केली. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--
०२,०४
मंदिराबाहेर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--
०३
भाविकांसाठी देवीचे अभिषेकही सुरू करण्यात आले असून या विधीसाठीही मोठी गर्दी होती. (छाया : आदित्य वेल्हाळ)
--