कोपार्डे : महापुराने यावर्षी नदी बुडीत क्षेत्रात मोठी वाढ झाली असून, पूर ओसरल्यानंतर नदी बुडीत क्षेत्रातील ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाल्याचे चित्र आहे. अक्षरशः ऊसाची कुजून माती व खोडवी झाली आहेत. एकरी उत्पादन घटणार असल्याने उत्पादन खर्च तरी निघतो की नाही, या चिंतेत शेतकरी पडला आहे.
करवीर तालुक्यात कुंभी, भोगावती, तुळशी, धामणी व पंचगंगा या नद्यांच्या काठावर मोठ्या प्रमाणात ऊस शेती केली जाते. पण गेल्या दोन वर्षात येणाऱ्या महापुराने नदी बुडीत क्षेत्रातील ऊस शेतीचे मोठे नुकसान होत आहे. यावर्षी करवीर तालुक्यात जुलै महिन्यात पडलेल्या ढगफुटीसदृश्य पावसाने धरणातील पाणीसाठा कमी असतानाही पाणी नदीपात्राच्या बाहेर पडले. २०१९पेक्षा यावर्षी महापुरामुळे पाच ते दहा फुटांनी पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे नदी बुडीत क्षेत्रात मोठी वाढ झाली.
यावर्षी महापुराचे पाणी कमी काळ ऊसाच्या क्षेत्रात राहिले असले तरी रेताड व गाळयुक्त पुराच्या पाण्याने ऊसाच्या सुरळीबरोबर ऊसाच्या कांड्याही कुजल्या आहेत. त्यामुळे यावर्षी २०१९पेक्षा मोठे नुकसान झाले आहे. शासनाने ऊसाला प्रतिगुंठा १३५ रुपये तर इतर पिकांना ६८ रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे. ही भरपाई तोकडी असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
चौकट
पंचनाम्यात अधिकाऱ्यांची मनमानी --
करवीर तालुक्यात महापुराच्या काळात पंचनामा करणारे तलाठी कृषी सहाय्यक, ग्रामसेवक यापैकी एकही शासकीय अधिकारी अनेक कर्तव्याच्या गावात नसल्याने पूररेषा निश्चित करताना त्यांना अडचणी येत आहेत. नुकसानग्रस्त शेतकरी यामुळे वंचित राहात असल्याने अनेक गावांत शासकीय अधिकारी व शेतकऱ्यांमध्ये वाद होत आहेत.
प्रतिक्रिया
अनेक गावांत महापुराच्या काळात शासकीय अधिकारी कर्तव्याच्या ठिकाणी नसल्याने पूररेषा निश्चित करताना अधिकाऱ्यांची मनमानी सुरू झाली आहे. नुकसानग्रस्त शेतकरी वगळल्याने तक्रारी वाढत आहेत. किमान आतातरी या अधिकाऱ्यांनी शेतावर जाऊन महापुराचे पाणी आलेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा.
संजय पाटील, शेतकरी, वाकरे
फोटो --
बालिंगा पुलाच्या पश्चिमेला असणाऱ्या भोगावतीच्या काठावरील नदी बुडीत क्षेत्रातील ऊस शेतीची महापुरामुळे अक्षरशः माती झाली आहे.