उद्धव गोडसेकोल्हापूर : हद्दवाढीसाठी प्रस्तावित असलेल्या शहरालगतच्या गावांमध्ये सध्या बांधकामांचा धूमधडाका सुरू आहे. हद्दवाढीचा निर्णय झाल्यास बांधकाम परवाने मिळवण्यात अडचणी येतील, या भीतीपोटी बांधकामांना गती आल्याचे दिसत आहे. परिणामी शहरालगतच्या गावातील बहुतांश रस्ते बांधकाम साहित्याने व्यापले आहेत.पाचगाव, कळंबा, मोरेवाडी, उजळाईवाडी, उचगाव, शिंगणापूर, बालिंगा या गावांचे झपाट्याने शहरीकरण झाले आहे. शहर आणि गावाच्या सीमारेषा यापूर्वीच धूसर झाल्या आहेत, त्यामुळे यासह आणखी काही गावांचा हद्दवाढीत समावेश होण्याची चर्चा सातत्याने सुरू असते. सध्या प्राधिकरणच्या माध्यमातून बांधकाम परवाने घेऊन बांधकामे करता येतात. मात्र, शहराच्या हद्दीत समावेश होताच बांधकामांना महापालिकेचे नियम लागू होतील. त्यानंतर परवाने मिळवण्यात अडचणी येतील, अशी नागरिकांची भावना आहे. परिणामी हद्दवाढ होण्यापूर्वी बांधकामे उरकण्याकडे कल वाढल्याचे दिसत आहे.विशेषत: कळंबा, पाचगाव, शिंगणापूर, उचगाव, मोरेवाडी या गावांमध्ये नवीन घरांची संख्या वाढत आहे. प्रदूषणमुक्त वातावरण, रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा आणि शैक्षणिक सुविधांच्या उपलब्धतेमुळे हद्दवाढीतील प्रस्तावित गावांमध्ये नवीन घरांना मागणी वाढली आहे. गेल्या वर्षभरात या मागणीत ३५ ते ४० टक्क्यांची वाढ झाल्याचे बांधकाम व्यावसायिक सांगतात. विशेष म्हणजे मूळ गावठाणांमध्येही जुन्या घरांच्या जागी नवीन घरे किंवा जुन्या घरांचे नूतनीकरण करण्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे रस्त्यांवर जागोजागी बांधकाम साहित्याचे ढीग दिसत आहेत.महापालिकेच्या नियमांची भीतीबांधकाम परवाने देताना महापालिकेची मोठी नियमावली असते. प्लॉटमधील रस्ते, रिकाम्या जागा, पार्किंग अशा नियमांवर बोट ठेवले जाते. गावांमध्ये छोटे प्लॉट आहेत. महापालिकेच्या बांधकाम नियमांचे काटेकोर पालन करणे कठीण असल्यामुळेच हद्दवाढीच्या निर्णयापूर्वी घरांचे बांधकाम करण्यास प्राधान्य दिले जात आहे.बांधकाम साहित्याच्या मागणीत वाढशहरालगतच्या गावांमध्ये सध्या अपार्टमेंटमधील फ्लॅटपेक्षा रो-हाऊसला मागणी वाढत आहे. काही ठिकाणी स्वतंत्र बंगलो बांधण्याकडेही कल आहे. बांधकामांची संख्या वाढताच बांधकाम साहित्याच्या मागणीत वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.गुंतवणुकीला प्राधान्यशहरासह काही उपनगरांमध्ये लोकसंख्येची घनता वाढल्यामुळे सुविधांवर ताण पडत आहे. निवांतपणा मिळावा यासाठी अनेक लोक शहरालगतच्या गावांमध्ये घर घेण्यास प्राधान्य देत आहेत. काही लोकांकडून गुंतवणुकीच्या उद्देशाने प्लॉट किंवा तयार घरांची खरेदी केली जात आहे.
कोरोना संसर्गानंतर अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येताच घरांच्या मागणीत वाढ झाली आहे. विशेषत: शहरालगतच्या गावांमध्ये नवीन घर घेण्यास प्राधान्य दिले जात आहे, त्यामुळे बांधकामांची संख्या वाढली आहे. - सागर पाटील - बांधकाम व्यावसायिक, पाचगाव