कोल्हापूर : मिरवणुकांमधील लेसर लाईट्सचा वापर मानवी डोळ्यांसाठी धोकादायक ठरत आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सना बंदी घातली. गुरुवारी (दि. १२) दुपारी बंदी आदेश जारी केला असून, कार्यवाहीसाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सचा वापर करणा-या मंडळांवर कारवाई होणार आहे.गणेश आगमन मिरवणुकांमध्ये सार्वजनिक मंडळांनी लेसर लाईट्सचा झगमगाट केला. मात्र, अतितीव्रतेच्या लाईट्समुळे उचगाव येथील एका तरुणाच्या डोळ्याला इजा झाली. मिरवणूक पाहण्यासाठी गेलेल्या अनेकांना लेसर लाईट्सचा त्रास झाला. याबाबत नियंत्रण कक्षाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. डोळ्यांवर उपचार करणारे ऑप्थॅल्मोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. चेतन खारकांडे यांनीही लेसर लाईट्सवर बंदी घालण्याची मागणी निवेदनाद्वारे जिल्हा प्रशासनाकडे केली होती.तक्रारींचा वाढता ओघ आणि लेसर लाईट्चा धोका लक्षात घेऊन अखेर अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ (१) नुसार गणेश विसर्जन मिरवणुकीत लेसर लाईट्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी दुपारी बंदी आदेश जारी करण्यात आला. या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या आहेत.पोलिस ॲक्शन मोडवरजिल्हा प्रशासनाने बंदी आदेश जारी करताच पोलिस ॲक्शन मोडवर आले आहेत. विसर्जन मिरवणुकीत मंडळांनी लेसर लाईट्सचा वापर करू नये, अन्यथा संबंधित मंडळांच्या लाईट्स जप्त करून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. लाईट्स आणि ध्वनियंत्रणा पुरवणा-या संघटनेसही पोलिसांनी बंदी आदेशाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
फिरंगाईचे टाळ्या वाजवत विसर्जनशिवाजी पेठेतील फिरंगाई तालीम मंडळाने यंदा ध्वनियंत्रणा आणि लेसर लाईट्सशिवाय टाळ्यांच्या गजरात गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. 'होय हिंदूच' असे लिहिलेले टी शर्ट परिधान करून शेकडो कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी होणार असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिका-यांनी दिली. पोलिसांनी मंडळाच्या भूमिकेचे स्वागत केले.