कोल्हापूर : तांत्रिक कारणामुळे ट्रू जेट कंपनीने कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवा शनिवार (दि. ७) ते शुक्रवार (दि. २७) दरम्यान तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातील मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी सेवा पुरविली जाते; त्यामुळे विमानसेवा स्थगित होण्याचा अखेरचा दिवस गुरुवार ठरला. या दिवशी एकूण १२४ जणांनी प्रवास केला.मुंबई विमानतळावरील धावपट्टीचे काम सुरू असल्याच्या तांत्रिक कारणामुळे या कंपनीने २१ दिवस ‘कोल्हापूर-मुंबई’ मार्गावरील विमानसेवा तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तिकीट विक्री आणि नोंदणीदेखील बंद केली आहे.
सेवा स्थगित होण्याच्या अखेरच्या दिवशी गुरुवारी मुंबईहून कोल्हापूरला ५५ प्रवासी आले, तर कोल्हापूरहून मुंबईला ६९ प्रवासी गेले. कंपनीच्या संकेतस्थळावर २८ डिसेंबरपासून तिकीट उपलब्ध असल्याचे दाखविण्यात येत आहे, अशी माहिती पर्यटनतज्ज्ञ बी. व्ही. वराडे यांनी गुरुवारी दिली.