कोल्हापूर : महापालिकेतर्फे चालू आर्थिक वर्षातील घरफाळा ३० जूनपूर्वी भरणाऱ्यांना सहा टक्के सवलत दिली जात आहे. या सवलतीचा आज, शेवटचा दिवस आहे. यामुळे अधिकाधिक करदात्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मालमत्ता कर ३० जून २०२१ अखेर भरणाऱ्या करदात्यांसाठी चालू आर्थिक वर्षातील मागणीमध्ये सहा टक्के सवलत दिली जात आहे. या सवलत योजनेचा बुधवार हा शेवटचा दिवस आहे. शेवटच्या दिवशी सहाही नागरी सुविधा केंद्रात गर्दी होणार, हे गृहीत धरून नियोजन केले आहे. १ एप्रिल ते २९ जूनअखेर सहा टक्के सवलत योजनेमधून महापालिकेच्या तिजोरीत १५ कोटी ४६ लाख २ हजार ४९६ रुपये जमा झाले आहेत. यामध्ये गांधी मैदान नागरी सुविधा केंद्रात १ कोटी ६५ लाख ४० हजार ३८१, छत्रपती शिवाजी मार्केट नागरी सुविधा केंद्रात १ कोटी ४८ लाख १४ हजार ७७२, राजारामपुरी नागरी सुविधा केंद्रात २ कोटी ४५ लाख ४५ हजार २९२, छत्रपती ताराराणी मार्केट नागरी सुविधा केंद्रात ३ कोटी २७ लाख ७३ हजार ९७१, महापालिका मुख्य इमारत नागरी सुविधा केंद्रामध्ये २ कोटी ८२ लाख २२ हजार ९७९, कसबा बावडा नागरी सुविधा केंद्रात २५ लाख ५७ हजार ५९६ अशा सहा नागरी सुविधा केंद्रामध्ये ११ कोटी ९४ लाख ५४ हजार ९६१ जमा झाले आहेत. याशिवाय ऑनलाईन पद्धतीने ३ कोटी ५१ लाख ४७ हजार ५३५ रुपये जमा झाले आहेत. नागरी सुविधा केंद्र व ऑनलाईन असे मिळून एकूण १५ कोटी ४६ लाख २ हजार ४९६ रुपये जमा झाले आहेत.
कोट
घरफाळा वेळेत भरून महापालिकेस सहकार्य करावे. ऑनलाईन भरणा करताना काही अडचणी आल्यास महापालिकेच्या डेटा सेंटरवर संपर्क साधावा. सहा टक्के सवलतीचा लाभ घ्यावा.
डॉ. कादंबरी बलकवडे, प्रशासक
चौकट
ऑनलाईन किंवा केंद्रावर सोय
शहरातील विविध विकासकामे, सेवा, सुविधा देण्यासाठी महानगरपालिका पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. पण कोरोनामुळे सध्या महापालिकेची वसुली कमी असल्याने आर्थिक टंचाई भासत आहे. यामुळे सर्व मिळकतधारकांनी http://kolhapurcorporation.gov.in:8080/kmcop/Mi/CitizenLogin.aspx या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अथवा महापालिकेच्या नागरी सुविधा केंद्रांमध्ये सकाळी ९ ते दुपारी साडेतीनपर्यंत घरफाळा भरावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.