कोल्हापूर : हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या पार्थिवाचे सोमवारी दुपारी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो कुस्ती रसिक, मल्ल तसेच मान्यवरांनी अंतिम दर्शन घेतले. भवानी मंडपातील न्यू मोतीबाग तालमीच्या प्रांगणात लाडक्या वस्तादांचे अखेरचे दर्शन घेताना पठ्ठ्यांनी ‘आबा ’, ‘ मामा ’ म्हणून फोडलेल्या टाहो उपस्थितांच्या काळजाला हात घालणारा होता.हिंदकेसरी आंदळकर यांचे (दि. १६) रविवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पुणे येथे ह्दयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे पार्थिव सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास कोल्हापूरातील न्यू पॅलेस परिसरातील त्यांच्या निवासस्थान शंभरठाणा (न्यू छत्रपती पार्क) येथे काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर आंदळकर यांची कर्मभूमी असलेल्या भवानी मंडपातील न्यू मोतीबाग तालीम मध्ये त्यांचे पार्थिव आणण्यात आले.
या ठिकाणी दर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतेल. भवनी मंडपातून दसरा चौकापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. यानंतर त्यांच्या मुळगावी पुनवत (ता. शिराळा, जि.सांगली) येथे अंतिम संस्कारासाठी पार्थिव नेण्यात आले.शाहू छत्रपती, पुढारीचे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव, खासदार धनंजय महाडीक, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, महापौर शोभा बोंद्रे, उर्वरित महाराष्ट्र अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार,जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माजी आमदार पी.एन.पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्यासह राज्यातील मल्ल उपस्थित होते.
पाहा व्हिडीओ -