निपाणी : जम्मू काश्मीर येथे दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले बुदिहाळ गावचे जवान प्रकाश पुंडलिक जाधव (वय २९) यांना हजारो लोकांच्या उपस्थितीत गुरुवारी अखेरचा निरोप देण्यात आला.गुरुवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास शहीद प्रकाश जाधव यांचे पार्थिव बेळगावमार्गे बुदिहाळ गावात दाखल झाले. पार्थिव गावात येताच उपस्थितांनी ‘वीर जवान अमर रहे’च्या घोषणा दिल्या. पोलीस प्रशासन व लष्कराने बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. यानंतर शहीद प्रकाश जाधव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. तत्पूर्वी संपूर्ण गावातून अंत्ययात्रा काढली. अंत्ययात्रेवेळी रस्त्याच्या दुतर्फा महिलांनी हातात फुले घेऊन गर्दी केली होती. शहीद प्रकाश जाधव यांची केवळ तीन महिन्यांची कन्या श्रावणी हिला पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते. यावेळी त्यांची पत्नी नीता, आई शारदा, वडील पुंडलिक यांच्यसह भाऊ सचिन व नातेवाइकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. यावेळी लष्करी अधिकाऱ्यांसह राजकीय, सामाजिक क्षेत्रांतील असंख्य लोक उपस्थित होते. अंत्ययात्रेत बुदिहाळसह, नांगनूर, यमगर्णी, श्रीपेवाडी येथील शाळकरी विद्यार्थी, चिकोडी तालुकयातील सुमारे२० हजारांपेक्षा अधिक लोक सहभागी झाले होते.