चंद्रकांत कित्तुरे ।अथणी : कर्नाटक विधानसभानिवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची रणधुमाळी उडविली आहे. असह्य उन्हाची पर्वा न करता उमेदवार अन् त्यांचे कार्यकर्ते पदयात्रा, मोटारसायकल रॅलीद्वारे मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. कागवाड, अथणी, कुडची मतदारसंघांत हे चित्र दिसून आले.या तिन्ही मतदारसंघांत बहुरंगी लढती असल्या तरी खरी लढत भाजप आणि काँग्रेसमध्येच आहे. कागवाडमध्ये भाजपचे विद्यमान आमदार राजू कागे व काँग्रेसचे श्रीमंत पाटील यांच्यात, अथणीमध्ये माजी सहकारमंत्री लक्ष्मण सवदी आणि काँग्रेसचे महेश कुमठोळ्ळी यांच्यात, तर कुडची मतदारसंघात भाजपचे पी. राजू आणि काँग्रेसचे अमित शामा घाटगे यांच्यात जोरदार चुरस आहे.काँग्रेस सिद्धरामय्या सरकारच्या कामगिरीच्या जोरावर, तर भाजप ‘यंदा भाकरी परतवा, मतदारसंघाचा विकास घडवून दाखवितो’ अशा शब्दांत मतदारांना आवाहन करीत आहेत. काँग्रेसकडून महाराष्टÑाचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची मंगसुळी येथे सभा झालीे, तर माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची सोमवारी अथणी येथे सभा झाली. दोघांच्याही सभांना मतदारांचा चांगला प्रतिसाद होता. भाजपच्या मात्र कोणत्याही मोठ्या नेत्याची सभा झालेली नाही. या तीनही जागांवर भाजपला सहज विजय मिळेल, हा आत्मविश्वासच त्याला कारणीभूत असल्याचे कार्यकर्ते बोलून दाखवितात. तरीही प्रचारात कोणतीही कसर बाकी ठेवायची नाही, या जिद्दीने उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते काम करीत आहेत. मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. सर्वच उमेदवारांनी मतदारसंघाचे दोन दौरे पूर्ण केले असून, अंतिम टप्प्यात तिसरा दौरा सुरू आहे. बहुतांशी मतदार ग्रामीण भागातील असल्याने पायाला भिंगरी बांधूनच त्यांना फिरावे लागत आहे.सांगली भाजपचेनेते कुडचीतकुडचीतील उमेदवार पी. राजीव यांच्या विजयासाठी सांगली जिल्हा भाजपचे माजी अध्यक्ष बंडोपंत देशमुख, जिल्हा चिटणीस अशोक साळुंखे आणि जत तालुका भाजपचे माजी अध्यक्ष नसीर शेख गेले महिनाभर तेथे तळ ठोकून आहेत.