तानाजी घोरपडे
हुपरी : गानकोकीळा लता मंगेशकर यांचे रौप्यनगरी हुपरी (ता.हातकणंगले) शहरांशी अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. मंगेशकर कुटुंबीयांच्या पडत्या काळात त्यांना मदतीचा हात देणाऱ्या स्वर्गीय राजकुमार दैने यांच्या घरी त्या कोल्हापूर दौऱ्यावर आल्या की हमखास भेटीसाठी हुपरीला येत असत.यावेळी दीदी गंगुबाई दैने व हिराबाई दैने यांना आवर्जुन भेटत. तर, प्रसिद्ध चांदी उद्योजक सुभाष आदापाण्णा भोजे यांचीही त्या भेट घेत असत. काहीवेळा त्यांच्यासोबत बहीण आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर भाऊ पंडित ह्रुदयनाथ मंगेशकर ही असायचे. त्यांना पाहण्यासाठी संपूर्ण परिसरातून मोठी गर्दी लोटत असत.गंगुबाई दैने व हिराबाई दैने हुपरीमध्ये एकट्याच राहात असत. त्या अगदी गरीब होत्या. तर त्यांचे घर साधे होते. तरी सुद्धा या जगप्रसिद्ध दीदी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरात येवुन मायेची गळा भेट घेवुन जात असत.
चांदी उद्योजक सुभाष भोजे यांच्या माध्यमातून उषा मंगेशकर रजनी हा संगीत कार्यक्रम त्यांनी रोटरी क्लबच्या मदतीसाठी मिळवून दिला होता. या संगीत रजनी कार्यक्रमा वेळी त्या स्वतः प्रेक्षकांच्या आसन कक्षेत बसुन या कार्यक्रचा शेवट पर्यंत आस्वाद घेतला होता. इतकचं नाही तर स्वताच्या कॅमेऱ्यातून फोटोग्राफी देखील केली होती.
सध्याचे युग हे संगणकीय युग आहे. त्यामुळे भावी पिढी संगणकीय सज्ञन व्हावी या उदात्त हेतुने दीदींनी आपल्या खासदार फंडातुन सुनिल कल्याणी यांच्या नेत्रुत्वाखालील येथील श्री व्यंकटेश एज्युकेशन संस्थेला संगणकीय प्रयोगशाळा उभारणीसाठी दहा लाख रुपयांचा निधी देखील दिला होता.
मुळचे हुपरीचे असलेले पण कोल्हापुरातील गुजरीमध्ये हुपरी अलंकार ज्वेलर्सचे मालक सुभाष आदाप्पाण्णा भोजे व पुतणे सतीश यांच्याशी त्यांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते. हुपरीच्या चांदी उद्योगातील एक प्रसिद्ध उद्योजक राजेंद्र शेटे यांच्याशी सुद्धा त्यांचा स्नेह होता. रोटरी क्लबच्या मदतीसाठी आयोजित उषा मंगेशकर रजनी कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्या हुपरीला येणार होत्या. त्यांच्या गाडीचे सारथ्य हे उद्योजक राजेंद्र शेटे यांनी केले होते.
लतादीदींनी दिला यशाचा कानमंत्र
शेटे यांना यावेळी आलेला अनुभव सांगताना ते म्हणाले, दीदींच्या निधनाची बातमी कानावर पडली आणि त्यांच्या सहवासातील आठवणी डोळ्यासमोर आल्या. सुभाष भोजे यांच्यामुळे लता दीदींना भेटण्याचा योग आम्हाला आला. मी लतादीदी यांना भेटी दरम्यान एक प्रश्न विचारला होता की यशस्वी होण्याचे रहस्य काय? त्यावेळी लतादीदींनी मला यशाचा कानमंत्र दिला की आपल्या कामाशी एकनिष्ठ राहून समर्पण वृत्तीने काम केले तर नक्कीच यशस्वी होणार.
रोटरी क्लबच्या कार्यक्रमासाठी पन्हाळा ते हुपरी दरम्यान मला लता दीदींचे सुभाष काका भोजे यांच्या सोबत आमच्या गाडीतून सारथ्य करण्याचे भाग्य लाभले. त्यांच्याकडून कामा प्रती एकनिष्ठता, समर्पण, विनम्रता आदी अनेक गुण शिकता आले. आज लता दीदी आपल्यातून देहरुपी जरी निघून गेल्या असल्या तरी त्यांच्या आठवणी कायम आमच्या स्मरणात राहणार आहेत.