कोल्हापूर : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी अखेरच्या काळात व्यक्त केलेली इच्छा मंगळवारी पूर्ण झाली. लता मंगेशकर यांच्या संपत्तीतील १० लाखांची देणगी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराला देणगी देण्यात यावी, असे त्यांनी वकिलांमार्फत लिहून ठेवले होते. लता मंगेशकर ट्रस्टतर्फे या रकमेचा धनादेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना सुपुर्द करण्यात आला.लता मंगेशकर यांची अंबाबाईवर श्रद्धा होती. आपल्या संपत्तीतील ठरावीक रक्कम मंदिराला देणगी म्हणून द्यावी, असे त्यांच्या मृत्युपत्रात लिहिले होते. त्यांची ही इच्छा पूर्ण करत मंगेशकर कुटुंबीयांकडून ट्रस्टच्या विश्वस्त उषा मंगेशकर यांनी त्यांचे कोल्हापुरातील निकटवर्तीय व गुजरीतील सराफा व्यावसायिक सुभाष देवाप्पा भोजे यांच्याकडे देवस्थान समितीच्या नावे धनादेश व देणगी स्विकारण्यासंबंधीचे पत्र पाठविले.
भोजे यांनी धनादेश जिल्हाधिकाऱ्यांना सुपुर्द केला. यावेळी माजी नगरसेवक किरण नकाते, हर्षवर्धन भोजे, नितीन इंगळे, प्रथमेश इंगळे उपस्थित होते.