कोल्हापूर : कोल्हापूरच्या चित्रपटसृष्टीच्या वैभवाची साक्ष देणाऱ्या जयप्रभा स्टुडिओच्या विभाजनाचा प्रस्ताव महापालिकेकडे सादर करण्यात आला आहे. त्याची कार्यवाही सुरू असून, हा प्रस्ताव आयुक्तांच्या विचाराधीन आहे. स्टुडिओच्या मालक गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना स्टुडिओच्या आवारातील उर्वरित मोकळी जागा विकासकाला देता यावी, यासाठीच हे विभाजन करण्यात येत आहे. यामुळे सव्वातीन एकरांत विस्तारलेल्या स्टुडिओच्या पश्चिमेसही टोलेजंग इमारतींचा मार्ग मोकळा होणार आहे.
छत्रपती राजाराम महाराज यांनी भालजी पेंढारकर यांना चित्रपट निर्मितीसाठीची अट घालून मंगळवार पेठेतील जयप्रभा स्टुडिओ सुपूर्द केला होता. भालजींनी आर्थिक अडचणीमुळे हा स्टुडिओ लता मंगेशकर यांना विकला. पुढे स्टुडिओची वाताहत झाली आणि तो बंद पडला. बाह्य चित्रीकरणासाठी वापरला जाणा-या मोकळ्या परिसराची विक्री होऊन टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. जयप्रभा स्टुडिओच्या इमारती पाडून तेथे विकास करण्यासाठीची पावले उचलली गेल्यानंतर २०१२ मध्ये याविरोधात मोठे जनआंदोलन उभे राहिले. परिणामी महापालिकेने वास्तू संरक्षित करण्यासाठी हेरिटेज वास्तूंच्या यादीत त्याचा समावेश केला. दरम्यान उच्च न्यायालयानेदेखील ही वास्तू जैसे थे स्थितीत ठेवण्याचे आदेश दिले होते. या विरोधात लता मंगेशकर यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका काही वर्षांपूर्वी मागे घेतली होती. जयप्रभा स्टुडिओच्या इमारती व भोवतालचा परिसर असे मिळून सध्या सव्वा तीन एकर जागा आहे.
या प्रकरणात नगरसेविका सुरेखा शहा यांनी २७ डिसेंबर २०१९ रोजी जयप्रभा स्डुडिओच्या जागेवर बांधकामाला अथवा व्यवसायाला परवानगी देऊ नये व या जागेवर चित्रपट व्यवसायासाठीचे आरक्षण टाकण्याचा ठराव महासभेत मंजूर झाला आहे. त्याची अंमलबजावणी केली का, या आशयाची माहिती मागवली होती. त्यावर महापालिकेने दिलेल्या माहितीची प्रत त्यांना सोमवारी (दि. २७) मिळाली असून त्यात जयप्रभा स्टुडिओच्या जागेवरील भूखंड विभाजनाचा प्रस्ताव आहे. महासभा ठरावाबाबत सविस्तर अहवाल सादर केला असून कार्यवाही सुरू आहे, असे नमूद केले आहे.प्रस्ताव दोन वर्षांपूर्वीचसध्या या सव्वातीन एकर परिसरात दोन हेरिटेज वास्तू आहेत. स्टुडिओच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर पश्चिमेला त्रिकोणी आकारात मोकळी जागा आहे. स्टुडिओची मूळ वास्तू व मोकळी जागा असे विभाजन करून मोकळी जागा विकासकाला द्यावी, असा हा प्रस्ताव आहे. लता मंगेशकर यांनी या जागेचे वटमुखत्यारपत्र मेजर यादव यांना दिले आहे. यादव यांनी दीड-दोन वर्षांपूर्वीच हा विभाजनाचा प्रस्ताव महापालिकेला दिल्याचे सूत्रांकडून समजले. यावर हेरिटेज समितीने मूळ वास्तूच्या संवर्धनाबाबत काय पावले उचलणार आहात याचा आराखडा सादर करा, अशी अट घातली होती. त्यावर कोणताही आराखडा सादर झाला नाही.नियम काय सांगतो...जयप्रभा स्टुडिओचा समावेश महापालिकेच्या ग्रेड हेरिटेज वास्तूत आहे. मूळ वास्तूभोवतीची काही जागा देखील हेरिटेजमध्ये असते. ही खासगी मालमत्ता असल्याने मालकाला मूळ वास्तूचे संरक्षण व संवर्धन करून सभोवतीची रिकामी जागा विकण्याचा अधिकार आहे.जयप्रभा स्टुडिओच्या वटमुखत्यार यांनी जागेच्या विभाजनाची मागणी केली आहे. त्यावर गेले दीड वर्ष कार्यवाही सुरू असली तरी अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. स्टुडिओच्या मुळ वास्तूला कोणताही धोका नाही, उलट तिचे संवर्धन करून ती वापरात आणता येणार आहे. या प्रकरणाचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे.- नारायण भोसले,उपशहर रचनाकार कोल्हापूर महापालिकास्टुडिओच्या विभाजनाच्या मागणीवर हेरिटेज समितीने वास्तू संवर्धनासाठी काय उपाययोजना करणार आहात त्याचा आराखडा द्या, असे सांगितले होते. त्यावर अद्याप कोणताही आराखडा समितीकडे आलेला नाही. वास्तू संवर्धनाच्या मूळ उद्देशाला बगल देणार नाही, यावर समिती ठाम आहे.- उदय गायकवाड, सदस्य, हेरिटेज समिती