कागल येथे प्रबोधनात्मक शिबिर
कागल : नरेंद्र मोदी सरकारने आणलेल्या नवीन कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांचा तर बळी जाणारच आहे; पण रोज पिशवीतून किलोभर धान्य खरेदी करणारा गरीब वर्गही संपणार आहे. अदानी, अंबानीसारख्या उद्योगपतींच्या हाती शेतीची अर्थव्यवस्था देऊन सर्वांना अन्नधान्यासाठी मोताद करणारा हा कायदा आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.
कागल येथील गाताडे मळ्यात ‘नवीन कृषी विधेयकाचे अनुकूल आणि प्रतिकूल परिणाम’ या विषयावर आयोजित प्रबोधनात्मक शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गहिनीनाथ कृषी मंडळाचे अध्यक्ष रमेश माळी होते.
उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने, विलासराव गाताडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनार्दन पाटील, तालुकाध्यक्ष तानाजी मगदूम, दत्ता सावंत, राजेंद्र माने, नगरसेवक आनंदा पसारे, बाबासाहेब नाईक, विवेक लोटे, सतीश गाडीवड्ड, योगेश गाताडे, आदी मान्यवर उपस्थित होते.
राजू शेट्टी म्हणाले की, या नवीन कायद्यामुळे शेती व्यवसाय भांडवलदार कंपन्यांच्या हाती जाईल. करारानंतर आमच्या जमिनी तारण देऊन या कंपन्या कर्ज उचलतील. शेतकरी वर्ग, सर्वच सामान्य जनतेसाठी हा घातक कायदा आहे. म्हणून कडाक्याच्या थंडीत एक महिना शेतकरी दिल्लीत ठाण मांडून बसलेले आहेत. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सागर कोंडेकर, रमेश माळी, अशोक शिरोळे यांची भाषणे झाली. कागल शहराध्यक्ष राजेंद्र बागल यांनी स्वागत केले. नीतेश कोगनोळे यांनी आभार मानले.
गुजरातमध्ये गोडाऊन तयार कशी..?
नवीन कृषी विधेयक मंजूर होण्यापूर्वीच गुजरातमध्ये अदानी, अंबानी यांची विशाल गोडाऊने कशी बांधली गेली? लोकशाहीचे सर्व संकेत, संसदीय परंपरा पायदळी तुडवून हे कायदे मंजूर केले. शेतकऱ्यांची एवढी काळजी असेल तर नरेंद्र मोदी सरकार शेतीमाल हमीभावापेक्षा कमी किमतीत खरेदी करता येणार नाही, असा कायदा का करीत नाही? असा सवालही राजू शेट्टी यांनी केला.
२६ कागल राजू शेट्टी
फोटो कॅप्शन
कागल येथे नवीन कृषी कायद्यासंदर्भात आयोजित शेतकरी प्रबोधन शिबिरात माजी खासदार राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी भय्या माने, रमेश माळी, सागर कोंडेकर, आदी मान्यवर उपस्थित होते.