कोल्हापूर : स्वातंत्र्यापासून मराठा समाज हा उच्च कूळ आणि धनदौलत असणारा समाज म्हणून गणला जात होता. मराठ्यांना आरक्षणाची गरज काय? म्हणून इतर सर्व समाज केवळ ‘मोठा भाऊ, मोठा भाऊ’ म्हणून मराठा समाजाला बाजूला सारत गेले. त्याचा परिणाम या समाजाच्या उन्नतीला मारक ठरला आणि आज समाजाला आरक्षणासाठी इतका मोठा लढा द्यावा लागत आहे. महिला अत्याचार प्रतिबंधक कायदे कागदावरच राहिले आहेत. त्यांची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली नाही. त्याचा परिणाम समाज आता भोगत आहे. हे थांबण्यासाठी आज आमच्या हक्काचे आरक्षण द्या, असे मत सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्या डॉ. जयश्री चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. कायद्याच्या चौकटीत राहून आम्ही आमचा हक्क मागत आहोत आणि तो शासनाने रीतसर द्यावा, असे प्रतिपादन त्यांनी केले.डॉ. चव्हाण म्हणाल्या, आजच्या काळात मराठा समाजातील महिलांना वैद्यकीय क्षेत्राबद्दल माहिती व्हावी; कारण एक महिलेचे आरोग्य बिघडले तर संपूर्ण कुटुंब विस्कळीत होते. त्यामुळे आरोग्यविषयक माहिती व्हावी. याचबरोबर वैद्यकीय क्षेत्राचा विचार करता मराठा मुली या क्षेत्रात कमी आहेत. हा सहभाग वाढण्यासाठी आरक्षणाची गरज आहे; कारण या क्षेत्रात अगदी नगण्य जागा आपल्या समाजातील मुले, मुलींसाठी आहेत. सद्य:स्थितीत वैद्यकीय क्षेत्रात पाच टक्के महिला कार्यरत आहेत. आरक्षण मिळाले तर शुल्कही कमी पडेल. त्यातून मुलींचा ओढा वाढला तर आपल्या भगिनीही मोठ्या प्रमाणात या व्यवसायात येऊन समाजाची सेवा करतील. जास्तीत जास्त मराठा मुली ग्रामीण भागात राहत असल्यामुळे वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षा पास होण्यासाठी पुरेशा सुविधा व मार्गदर्शन मिळत नाही. त्यात पालकांचीही मन:स्थिती बदलणे गरजेचे आहे. याकरिता आरक्षण मिळाले तर वैद्यकीय क्षेत्रातील मराठा मुलींच्या प्रवेशात वाढ झाल्याचे चित्र दिसेल. मराठा महिलांना आरक्षणाचा फायदा स्वयंरोजगार निर्मिती व उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी होईल. रोजगार निर्मितीमुळे महिलाही स्वत:च्या पायावर उभ्या राहतील. आपल्या महिला शेतीपूरक व्यवसायही स्वत:च्या हिमतीवर मोठ्या प्रमाणात करू शकतील. त्याकरिता मराठा आरक्षण महत्त्वाचे आहे. मराठा मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात टॅलेंट आहे. तिचा वापर देशाच्या प्रगतीमध्ये होऊ शकतो. यासाठी उच्च शिक्षणाची दारे खुली झाली पाहिजेत. कारण आमच्या मराठा मुलींमध्ये उच्च दर्जाची गुणवत्ता असूनही केवळ अन्य समाजांतील मुलींना आरक्षण असल्याने मराठा मुलींच्या शिक्षणाच्या संधी जात आहेत. एकदा शिक्षणाची संधी गेली की, पुढे त्याचा परिणाम नोकरीमध्येही होतो. त्यामुळे मराठा आरक्षण ही समाजाची काळाची गरज आहे. कोपर्डी अत्याचार प्रकरणातील दोषी नराधमांना फाशीचीच शिक्षा व्हावी. खटला जलदगती न्यायालयात चालवावा. या घटनेतही अॅट्रॉसिटीसारख्या कायद्याचा वापर करण्याचा प्रयत्न नराधमांच्या नातेवाइकांकडून झाला. त्यामुळे अॅट्रॉसिटी कायद्याचा ही मंडळी कसा गैरवापर करीत आहेत, हेही समाजापुढे आले आहे. त्यामुळे आतापर्यंत दबून राहिलेला मराठा समाजाचा आवाज या लाखोंच्या मराठा मूक मोर्चातून निघू लागला आहे. सरकारने मराठा महिलांना आरक्षणाबरोबरच विमा संरक्षण देणे गरजेचे आहे. ...हे व्हायला हवेमराठा मुलींना आरक्षण मिळाल्यास वैद्यकीय क्षेत्रात जाण्यासाठी सरकारने प्रोत्साहन योजना सुरू करावी. वैद्यकीय प्रवेशांकरिता मार्गदर्शन मोफत केले पाहिजे. भारत कृषिप्रधान देश आहे. शेती जगतातही महिलांचा राबता मोठ्या प्रमाणात आहे. स्वयंरोजगार निर्मितीसाठी शासनस्तरावर आरक्षणाच्या माध्यमातून कर्जउपलब्धी करून द्यावी. महिलांच्या आरोग्यविषयक काळजीपोटी शासनाने वैद्यकीय विमा संरक्षण द्यावे.नोकरी, व्यवसाय, खासगी उद्योग यांमध्ये मराठा महिलांसाठी मिळणाऱ्या आरक्षणापेक्षा जादाचे आरक्षण राखीव ठेवावे. आरक्षणाच्या माध्यमातून महिलांना उद्योग उभारणीसाठी कमी व्याजदरात कर्ज उपलब्धीसाठी तरतूद करावी.अपेक्षा मराठा समाजातील मोठ्या उद्योजकांनी आपल्या समाजातील मुलींना नोकरीत प्राधान्य द्यावे.एक मुलगी शिकली तर त्यापुढील पिढ्या सुशिक्षित होतात. त्यामुळे लहानपणापासून मुलगीला मुलगा म्हणून वागणूक द्यावी.समाजातील मुलींना अन्याय सहन करायचा नाही; त्याला तोडीस तोड उत्तर द्यायचे, असे ‘बाळकडू’च पालकांनी द्यावे.
कायद्याची कडक अंमलबजावणी व्हावी
By admin | Published: October 11, 2016 12:52 AM