कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात होण्यासाठी वकीलांनी पुन्हा वज्रमुठ बांधली आहे. कोल्हापूर बार असोसिएशनने यासाठी पुढाकार घेतला असून सहा जिल्ह्यातील वकीलांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत.कोल्हापुरात खंडपीठासाठी अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. मागील महिन्यांत कसबा बावडा येथील न्यायसंकुलच्या हॉलमध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूरमधील बार असोसिएशनच्या शिष्टमंडळाची बैठक झाली.
यावेळी खंडपीठासाठी जोमाने आंदोलन सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला होता. खंडपीठ कृती समितीचा अध्यक्ष हा कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष असतो. दरवर्षी बार असोसिएशन अध्यक्ष बदलला जातो. त्यामुळे खंडपीठाची कायमस्वरूपी समिती स्थापन करण्याच निर्णयही यावेळी झाला होता. तसेच शेंडा पार्क येथील २४ एकरावरील जागेमध्ये खंडपीठाचे फलक लावून आंदोलनाचे पुन्हा रणशिंगे फुंकण्यावरही एकमत झाले होते. यानुसार कायमस्वरूपी समिती नियुक्त करण्यासाठी आणि आंदोलनाची धार पुन्हा तीव्र करण्यासाठी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष रणजित गावडे यांनी सहा जिल्ह्यातील वकीलांची गाठीभेटी सुरू केल्या आहेत. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या सोबत बैठक घेण्यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत.