कोल्हापूर : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मंगळवारी सकाळी वकील व पक्षकारांनाच जिल्हा न्यायालयाच्या आवारात प्रतिबंध केल्याने प्रवेशद्वारावरच काहीकाळ गोंधळ माजला. सुमारे दिड तास प्रवेशद्वारावर मोठी गर्दी झाली होती, आवाराबाहेर वकीलांच्या वाहनांच्या रांगा लागल्याने चौकात वाहतुकीची कोंडी झाली होती. अखेर साडेबाराला वकिलांची थर्मल तपासणी करत न्यायालयाच्या आवारात टप्पटप्याने प्रवेश देण्यात आला. आज,बुधवारपासून जिल्हा व सत्र न्यायालय आणि त्यांच्या अधिपत्याखालील सर्व तालुका न्यायालयात फक्त तातडीची व रिमांड प्रकारणाचे कामकाज चालणार आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सर्व न्यायालयीन कामकाज आज, बुधवारपासून पुढील आदेश येईपर्यत सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यत तसेच दुपारी १.३० ते ३.३० या कालावधीत दोन सत्रातच चालणार असल्याचे जाहीर केले. या दोन सत्रात फक्त तातडीची प्रकरणे तसेच रिमांड प्रकरणाची कामे चालणार आहेत.
दरम्यान, कार्यालयीन वेळही सकाळी १०.३० ते दुपारी ४ वाजोपर्यत राहणार आहे. न्यायालयात प्रत्येक दिवशी ५० टक्के कर्मचारी उपस्थित ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश वृषाली जोशी यांनी काढले. न्यायालयातील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी तातडीची प्रकरणे वगळून अन्य प्रकरणात पुढील तारखा देण्यात येत आहेत. शनिवारी कामकाज बंद राहणार आहे. कॅन्टीन बंद ठेवले आहे.या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी ११ वाजता वकील, पक्षकार यांना न्यायालयाच्या मुख्य प्रवेद्वारावरच आडवले. त्यामुळे प्रवेशद्वारावरच मोठी मर्दी झाली. बाहेर रस्त्यावर वकीलांच्या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रवेशद्वारावरच काही काळ गोंधळ माजला होता. दुपारी साडेबारा वाजता प्रत्येक वकीलांच्या कामकाजाबाबत खात्री करुनच त्यांना सॅनीटायझर करुनच न्यायालय आवारात प्रवेश देण्यात आला.
पक्षकारांना मात्र प्रवेश नाकारला. उच्च न्यायालयाने पाठवलेल्या नियमावलींचे आज, बुधवारपासून काटेकोर अंमलबजावणी करणार असल्याची माहिती महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे सदस्य ॲड. विवेक घाटगे व जिल्हा बार असो.चे अध्यक्ष रजणीत गावडे यांनी पत्रकारांना दिली.