कोल्हापूर : दिवाळीदरम्यान करण्यात येणारे लक्ष्मीपूजन करीत शिवसेनेच्या वतीने ‘महावितरण’च्या कार्यालयासमोर शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील अनेक शेतकऱ्यांनी पैसे भरूनही त्यांना वीज कनेक्शन्स न मिळाल्याने जिल्हाप्रमुख विजय देवणे आणि जिल्हाप्रमुख व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली.
दुपारी बारानंतर शिवसैनिकांनी महावितरणच्या कार्यालयासमोर फलक फडकवत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. महावितरणच्या निषेधाच्या घोषणा देत वातावरण दणाणून सोडले. यानंतर देवणे आणि पवार यांच्यासह सर्वांनी मुख्य अभियंता अनिल भोसले यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली.
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील सुमारे १५ हजार शेतकºयांनी १५ एप्रिलअखेर पैसे भरले तरी त्यांना गेल्यावर्षीपासून कनेक्शन्स मिळालेली नाहीत. शेतकºयांना वेळेत वीज जोडणी देता येत नाही, म्हणून महावितरणने गाजावाजा करीत उच्चदाब वितरण प्रणालीतून ही जोडणी देणार असल्याचे जाहीर केले. मात्र, याबाबतच्या आदेशाला केराची टोपली दाखवली, असा आरोप यावेळी देवणे आणि पवार यांनी केला.
मराठवाडा, विदर्भासाठी वेगळे धोरण आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी वेगळे धोरण हे चालणार नाही, असे सांगत वेळेत बिले भरल्यानंतर, वीज चोरी नसताना जर आमच्या भागातील शेतकºयांना कनेक्शन्स लवकर मिळणार नसतील तर तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी दिला. मार्च २०२० पर्यंत सर्वांना कनेक्शन्स मिळतील, अशी ग्वाही यावेळी भोसले यांनी आंदोलनक र्त्यांना दिली.आंदोलनामध्ये शुभांगी पोवार, प्रा. शिवाजी पाटील, सुजित चव्हाण, दुर्गेश लिंग्रस, विराज पाटील, तानाजी आंग्रे, कमलाकर जगदाळे, धनंजय सावंत, शशिकांत बिडकर, अनिल पाटील, आदींनी सहभाग घेतला.खोट्या नोटा साहेबांच्या टेबलावरया आंदोलनासोबतच शिवसैनिकांनी ‘लक्ष्मीपूजन’ विधीची तयारी केली होती. ताह्मणामध्ये खोट्या नोटा, मंगल कलश आणला होता. तो साहेबांच्या टेबलावर ठेवण्यात आला होता. शिवसेनेच्या या वेगळ्या आंदोलनाची चर्चा सुरू होती.