कोेल्हापूर : येथील लक्ष्मीसेन जैन मठाचे मठाधीश स्वस्तिश्री डॉ. लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी दोन वाजता रायबाग (कर्नाटक) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी, कोल्हापुरातील जैन मठात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.डॉ. लक्ष्मीसेन महास्वामीजींचे गुरुवारी (दि. २०) पहाटे महानिर्वाण झाले. त्यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी सहा ते आठ या वेळेत लक्ष्मीसेन जैन मठात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, इंदुमती आवाडे, दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांच्यासह जैन बांधवांनी स्वामीजींचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर स्वामीजींचे पार्थिव रायबाग (कर्नाटक) येथे नेण्यात आले. येथे मिरवणुकीने त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारांच्या ठिकाणी आणण्यात आले. येथे धार्मिक विधी झाल्यानंतर पार्थिवावर अग्निसंस्कार करण्यात आले. यावेळी दक्षिण भारतातील भट्टारक, विविध मठांचे मठाधीश, लिंगायत मठाधीश यांच्यासह कर्नाटकातील आमदार उपस्थित होते. श्रावक-श्राविकांच्या अलोट गर्दीत स्वामीजींना शेवटचा निरोप दिला.
लक्ष्मीसेन स्वामीजी अनंतात विलीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:52 PM