आजरा : आजरा साखर कारखान्याच्या कामगारांना दिलेली ‘ले-ऑफ’ची मुदत गुरुवारी संपली. त्यामुळे आज, शुक्रवारपासून कारखान्याचे कायम कामगार कामावर हजर होत आहेत. कारखाना गेल्या दोन वर्षांपासून बंद आहे तर कामगारांनी सलग ३ वर्षे ५० टक्के पगारावर काम करण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. चालूवर्षाचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी सर्वच यंत्रणा गतिमान झाल्या आहेत.
आजरा साखर कारखाना गेल्या दोन गळीत हंगामात बंद राहिला आहे. त्याचा परिणाम कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी, वाहतूकदार यासह छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना बसला आहे. जिल्हा बँकेने आपले थकीत कर्ज वेळेत भरले नाही म्हणून आजरा कारखाना आपल्या ताब्यात घेतला होता. मात्र, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील सहकारी संस्था व हसन मुश्रीफ, सतेज पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार राजेश पाटील यांच्या सहकार्यातून जिल्हा बँकेचे थकीत कर्ज भरण्यात आले. त्यानंतर जिल्हा बँकेकडून कारखाना सुरू करण्यासंदर्भात कर्ज उपलब्ध करून दिल्याने चालू वर्षाचा गळीत हंगाम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
चालू वर्षाचा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी कारखान्यातील कायम कामगारांना १६ जुलैपासून कामावर हजर होण्याबाबत कळविण्यात आले आहे.