कोल्हापूर : व्यापाऱ्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या करावर हे सरकार चालत असूनही ते व्यापाऱ्यांवर जाचक अटी लावत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती नियमन (सेस) रद्द करायलाही ते तयार नाहीत. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी एकजुटीने ‘एलबीटी’ घालवली आता जाचक ‘सेस’ही कोल्हापूरकरच घालवतील. त्यासाठी एकजूट व्हा, असे कळकळीचे आवाहन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी बुधवारी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना केले.कृषी उत्पन्न बाजार समिती नियमन (सेस) रद्द करा, लीगल मेट्रॉलॉजी कायदा नियम ३ मधील प्रस्तावित बदल करू नये, जीएसटी कायदा सुटसुटीत करा, यासाठी येत्या २७ ऑगस्टला राज्यस्तरीय व्यापार बंद पुकारला आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील व्यापाऱ्यांची दिशा ठरवण्यासाठी बुधवारी दिगंबर जैन बोर्डिंग येथे व्यापाऱ्यांची परिषद झाली. या परिषदेला महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ॲण्ड इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष रमाकांत मालू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. परिषदेस जिल्ह्यातील ३०० हून अधिक व्यापारी उपस्थित होते.
शेटे म्हणाले, सरकारला जागे करण्यासाठी येत्या २७ ऑगस्टला राज्यव्यापी बंद पुकारला आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील सर्वांनी ताकदीने सहभागी व्हावे. ‘एक देश, एक कर’ ही यंत्रणा असताना इतर करांच्या माध्यमातून व्यापाऱ्यांना लुबाडणूक केली जात आहे. व्यापाऱ्यांच्या माध्यमातून व्यापारी उद्योजक दरमहा दोन लाख दहा हजार कोटींचा जीएसटी भरतात. त्यामानाने मार्केट सेस काढण्यास फक्त ३५० कोटींची गरज असताना शासनाची तो रद्द करताना उदासीनता दिसते. शासनाने आता व्यापारी-उद्योजकांना गृहीत धरणे बंद करावे, असा इशाराही त्यांनी दिला.रमाकांत मालू म्हणाले, सरकारने ‘एक देश, एक कर’ योजना जाहीर केली. मात्र, ही योजना कागदावरच आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी हा बंद यशस्वी करूया. संजीव परीख यांनी स्वागत केले. भगतराम छाबडा, वैभव सावर्डेकर, अशोक अहुजा, अजित कोठारी, कुमार अहुजा, श्रीनिवास मिठारी, विक्रम खाडे, सुरेश इंग्रोळे यांनी मनोगत व्यक्त केले. राजू पाटील, प्रशांत शिंदे, जयेश ओसवाल, राहुल नष्टे, उज्ज्वल नागेशकर, बाबासो. कोंडेकर उपस्थित होते. विवेक शेटे यांनी सूत्रसंचालन केले. धनंजय दुग्गे यांनी आभार मानले.
पैसे मागायला लाज नाहीराशिवडे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष एकनाथ चौगुले यांनी अन्न व औषध प्रशासन व वजन-माप नियंत्रण अधिकाऱ्यांकडून कसे पैसे उकळले जातात, याचे किस्से ऐकविले. वरच्या साहेबांना द्यायला लागतात म्हणून यांचे आकडे प्रत्येक वर्षी दुप्पट-तिप्पट पटींनी वाढले आहेत. आता तर दिवाळीही द्यावी लागते, असे सांगत त्यांच्या या सततच्या मागणीमुळे व्यापारी त्रस्त असल्याची खंत व्यक्त केली. व्यापाऱ्याचे उत्पन्न किती आहे, याचा विचार न करता त्यापेक्षा अधिकच्या रकमेची मागणी होत असून त्यांना हे मागताना लाजही वाटत नाही, या शब्दांत चौगुले यांनी अधिकाऱ्यांचे कारनामे उघड केले.