चौदा वर्षांनंतर राहुल गांधी कोल्हापुरात, काँग्रेसची उमेद वाढविणारा दौरा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 01:09 PM2024-10-03T13:09:11+5:302024-10-03T13:10:48+5:30

राज्यभरातील १२०० प्रतिनिधी कोल्हापुरात

Leader of Opposition in Lok Sabha Rahul Gandhi to visit Kolhapur tomorrow after fourteen years | चौदा वर्षांनंतर राहुल गांधी कोल्हापुरात, काँग्रेसची उमेद वाढविणारा दौरा

चौदा वर्षांनंतर राहुल गांधी कोल्हापुरात, काँग्रेसची उमेद वाढविणारा दौरा

कोल्हापूर : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे तब्बल चौदा वर्षांनंतर उद्या शुक्रवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार असून, काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागताची अभूतपूर्व तयारी केली आहे. ऐन विधानसभेच्या तोंडावर राहुल यांचा कोल्हापूर दौरा काँग्रेस कार्यकर्त्यांची उमेद वाढवणारा ठरणार आहे.

राहुल गांधी हे उद्या शुक्रवारी सायंकाळी ५:३० वाजता कोल्हापूर विमानतळावर येणार असून, तेथून ते थेट कसबा बावड्यातील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अनावरण कार्यक्रमाला जाणार आहेत. या कार्यक्रमात ते काय बोलणार याची उत्सुकता आहे. दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी १:३० वाजता नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी अभिवादन करतील. यानंतर हॉटेल सयाजी येथे होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत.

याआधी राहुल हे मार्च २००९ मध्ये कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. कागलच्या शाहू साखर कारखान्यावर त्यांचा कार्यक्रम झाला होता. नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांच्या कोल्हापूर शहरातील निवासस्थानीही त्यांनी भेट दिली होती. त्यानंतर तब्बल चौदा वर्षांनंतर गांधी हे कोल्हापुरात येणार असल्याने त्यांचे कार्यक्रम होणाऱ्या कसबा बावडा, शाहू समाधीस्थळ व हॉटेल सयाजी येथे त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आमदार सतेज पाटील यांनी या कार्यक्रमांचे नेटके नियोजन केले आहे.

राज्यभरातील १२०० प्रतिनिधी कोल्हापुरात

हॉटेल सयाजी येथे शनिवारी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनासाठी विविध सामाजिक संघटनांचे निमंत्रित १२०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात संविधानावर चर्चा करण्यात येणार आहे. राजर्षी शाहू महाराज यांच्या समतेच्या नगरीत होणारे या संमेलनाकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

काँग्रेसला अधिक बळ, पदाधिकारी कामाला

विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरातील काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी या दौऱ्यासाठी अहोरात्र झटत आहेत. जिल्ह्यात सध्या काँग्रेसचे विधानसभेचे चार, विधानपरिषदेचे दोन आमदार, तर एक खासदार आहे. राज्यात काँग्रेसला सर्वाधिक बळ देणारा जिल्हा म्हणून कोल्हापूर ओळखला जातो. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी यांच्या या दौऱ्याने काँग्रेसला अधिक बळ मिळाल्याचे मानले जाते.

असा असेल दौरा

४ ऑक्टोबर
सायं. ५:३० वाजता कोल्हापूर विमानतळ येथे आगमन, सायं. ६ वाजता कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा अनावरण.

५ ऑक्टोबर
दुपारी १:३० वाजता - राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळी अभिवादन.
दुपारी २:३० वाजता : हॉटेल सयाजी, संविधान सन्मान संमेलन कार्यक्रमास उपस्थिती.
सायंकाळी ४ वाजता : हॉटेल सयाजी येथून कोल्हापूर विमानतळकडे प्रयाण.

Web Title: Leader of Opposition in Lok Sabha Rahul Gandhi to visit Kolhapur tomorrow after fourteen years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.