कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या (गोकुळ) अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक विश्वास नारायण पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. सत्तारुढ आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह नेत्यांनी विश्वास पाटील यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. शुक्रवारी सकाळी त्यांचे नाव जाहीर केले.
या पदासाठी सत्तारुढ गटातून विश्वास पाटील आणि ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्यात चुरस होती. आज शुक्रवारी दुपारी एक वाजता होणाऱ्या निवड सभेत करवीरचे प्रांताधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षपदाच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.तब्बल तीन दशकांनंतर सत्तांतर घडवण्यात महत्त्वाची भूमिका निभावलेल्या विश्वास नारायण पाटील यांच्याच गळ्यात अखेर गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ पडली. लोकमतने पहिल्या दिवसापासूनच विश्वास पाटील हेच नवे अध्यक्ष होणार असल्याचे वृत्त दिले होते. निवड जाहीर होण्यापूर्वी विश्वास पाटील यांनी नेहमीप्रमाणे सकाळी अंबाबाईचे दर्शन घेतले.अध्यक्षपदाचे नाव निश्चित करण्यासाठी गुरुवारी दिवसभर नेते व संचालकांच्या स्वतंत्र बैठका होऊन वैयक्तिक मते आजमावली गेली. यानंतरही नाव निश्चित न झाल्याने अखेर अध्यक्षपदाचे दावेदार असलेले विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांच्यापैकी एक नाव लिफाफ्यात बंद करण्यात आले. तो लिफाफा आज नेत्यांनी संचालक मंडळाकडे पाठविला.या निवडीसाठी १७ विरुध्द ४ असे बलाबल असल्याने विरोधकांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे अध्यक्ष निवड बिनविरोध होणार हे निश्चित होते. ह्यगोकुळह्णमध्ये मागील दोन पंचवार्षिकमधील इतिहास पाहिला, तर प्रत्येक अध्यक्षाला दोन-दोन वर्षांची संधी दिली होती. ९७ व्या घटना दुरुस्तीनंतर दरवर्षी न करता पाच वर्षांसाठी अध्यक्ष निवड करण्याची तरतूद आहे. ह्यगोकुळह्णच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर विश्वास पाटील यांना अध्यक्ष म्हणून संधी दिली.यासाठीची पूर्वतयारी म्हणून गुरुवारी कसबा बावड्यातील डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजवर सत्ताधारी आघाडीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी दोन सत्रात आढावा बैठक घेतली होती.पहिल्या सत्रात सकाळी सत्ताधारी आघाडीतील सहभागी सर्व नेत्यांची बैठक घेऊन अध्यक्षपदाच्या नावावर चर्चा झाली. यानंतर संध्याकाळी साडेचारच्यासुमारास सत्ताधारी सर्व संचालकांना बैठकीला बोलावण्यात आले. एकत्रित चर्चेऐवजी प्रत्येक संचालकाला स्वतंत्रणपणे बोलावून त्यांच्याकडून अध्यक्षपदाबाबतचे वैयक्तिक मत आजमावून घेतले गेले.दोन्ही दावेदारांमध्ये होती रस्सीखेचअध्यक्षपदावरून संचालकांची वैयक्तिक मते आजमावून घेतल्यानंतर मुश्रीफ आणि सतेज पाटील यांनी या पदाचे प्रमुख दावेदार असलेले विश्वास पाटील व अरुण डोंगळे यांना बोलावून घेत त्यांनी एकत्र बसून आपापसातील चर्चेनंतर दोघांपैकी एक नाव द्यावे, असा तोडगा काढला. यानंतर बराच वेळ हे दोघे बंद खोलीत चर्चा करत होते, पण त्यांच्यात एकमत होत नव्हते. अध्यक्षपदाच्या दोन टर्म करायच्या, तर आधी कोण असणार यावरून दोघांमध्ये बरीच रस्सीखेच झाल्याचे समजते.अशीही दक्षताकोरोनाचा संसर्ग वाढला असताना, अध्यक्ष निवडीवरून गर्दी झाली, असा चुकीचा संदेश जनतेमध्ये जाऊ नये म्हणून गोकुळमधील सत्ताधारी आघाडीचे नेते ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी गुरुवारी डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजवर घेतलेल्या संचालकांच्या बैठकीत बाहेरील कुणालाही प्रवेश देण्यास सक्त मनाई केली. माध्यमांच्या प्रतिनिधींनाही बैठकीपासून लांबच ठेवले.