कोल्हापूर : एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीचे उमेदवार निश्चित होत असताना दुसरीकडे भाजप मात्र आतबट्ट्यात येण्याची शक्यता आहे. कारण कागल, चंदगडसह अन्य काही ठिकाणी भाजपचे विधानसभेसाठीचे इच्छुक नेते दोन ओळींचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक कसोटीची ठरणार आहे.ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्याला पुन्हा उमेेदवारी असे महायुतीच्या उमेदवारीचे सूत्र सांगण्यात येते. त्यामुळे पहिली वात कागल मतदारसंघातच लागली आहे. या ठिकाणी मंत्री हसन मुश्रीफ यांची उमेदवारी निश्चित असल्याने साहजिकच भाजपचे समरजित घाटगे हे अन्य पर्याय शोधू शकतात, अशी चर्चा आहे. अपक्ष लढून विजयापर्यंत पोहोचता येत नसेल तर मग मतांची ‘तुतारी’ कशी वाजवायची असा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. मात्र, त्यांनी याबाबत अधिकृत कोणतीही घोषणा केलेली नाही.
चंदगड तालुक्यात भाजपचे शिवाजीराव पाटील यांचीही अवस्था अशीच आहे. तेथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांची उमेदवारी निश्चित असल्याने शिवाजीराव पाटील पुन्हा एकदा अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे. दोन दिवसांपूर्वी खासदार धनंजय महाडिक यांनी ‘भाऊ, आम्ही तुमच्यासोबत’ असे जाहीर केल्याचेही पडसाद उमटण्याची शक्यता आहे. येथे संग्राम कुपेकरांच्या भूमिकेविषयीही उत्सुकता आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष भुदरगडमधील राहुल देसाई यांनीही निवडणूक रिंगणात उतरण्याचे जाहीर केले आहे. या ठिकाणी महायुतीची उमेदवारी शिंदेसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनाच मिळणार असताना भाजपच्या जिल्हाध्यक्षांचे हे वक्तव्य चर्चेत आले आहे. उमेदवार वाढले तर त्याचा फायदा आबिटकरांना होतो. त्यामुळे देसाई यांना थांबवून के. पी. पाटील यांच्यामागे त्यांनी राहावे यासाठीही प्रयत्न सुरू आहेत.
हाळवणकरांच्या पुनर्वसनाची चर्चाभाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेश हाळवणकर यांना विधान परिषदेवर संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. १२ जागांच्या नियुक्तीवेळी त्यांना संधी मिळेल असे सांगण्यात येते. तसे झाले तर भाजपचे सहयोगी सदस्य ताराराणीचे विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांना निवडणूक सोपी होईल; परंतु जेव्हापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आवाडे यांच्या घरी येऊन गेले आहेत तेव्हापासून आवाडे आणि शिंदेंमध्ये विधानसभेच्या दृष्टीने चर्चा झाली असून, शिंदेसेनेच्या धैर्यशील माने यांना मताधिक्य देणाऱ्या इचलकरंजीत आपला आमदार असावा असे शिंदे यांना वाटत असल्याचे सांगण्यात येत असून, त्यादृष्टीनेही आवाडे यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, आवाडे यांनी अजूनही पत्ते खोललेले नाहीत.