सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेसमध्ये फूट पाडून राष्ट्रवादीने केलेल्या खेळीला उत्तर देण्यासाठी काँग्रेसनेही समदु:खी नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे पॅनेल उभारण्याची तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात शनिवारी सांगलीत बैठक झाली. अन्य पक्षांच्या समदु:खी नेत्यांशी त्यांची चर्चाही झाली. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे आ. जयंत पाटील, भाजपचे खासदार संजय पाटील, काँग्रेसचे मदन पाटील एकत्र आल्यानंतर काँग्रेस व अन्य पक्षाच्या नेत्यांना जोरदार धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न आता होत आहे. शनिवारी सांगलीत काँग्रेसने जिल्ह्यातील नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीस जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील, भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांचे पुत्र रणधीर नाईक, दिगंबर जाधव, आदी नेते उपस्थित होते. दोन तास ही बैठक सुरू होती. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मोहनराव कदम म्हणाले की, आम्ही समदु:खी नेते एकत्र येऊन स्वतंत्र पॅनेल उभारणार आहोत. आ. पतंगराव कदम सोमवारी, २७ एप्रिल रोजी सांगलीत येत आहेत. त्यांच्याच उपस्थितीत याची चर्चा होऊन पॅनेलचे नावही निश्चित केले जाईल. बऱ्याच लोकांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. अजूनही काहीजण संपर्कात आहेत. त्यामुळे आम्ही अशा सर्व लोकांना बरोबर घेऊन निवडणूक लढविणार आहोत. मिरज, पलूस, कडेगाव, जत आणि कवठेमहांकाळ येथे आमचे बहुमत आहे. अन्य काही नेते आमच्याबरोबर आले तर निश्चितपणे बँकेतही आमचे बहुमत आम्ही सिद्ध करू शकतो. सर्वसामान्य लोकांचे हे पॅनेल असेल. बँकेच्या हितासाठी आम्ही पॅनेल उभारणार आहोत. (प्रतिनिधी) उमेदवारही निश्चित होणार १९ उमेदवारांचे पॅनेल उभे करताना काँग्रेसला काही ठिकाणी दोनऐवजी एक उमेदवार द्यावा लागणार आहे. त्यामुळे एकाच गटात दोन अर्ज असतील तर तेथे एकाला शांत करावे लागेल. या गोष्टी शक्य होतील, असे मोहनराव कदम, विशाल पाटील म्हणाले. दिग्गजांचे पॅनेल काँग्रेसच्या पुढाकाराने तयार होणाऱ्या सर्वपक्षीय पॅनेलमध्ये मोहनराव कदम, विशाल पाटील यांच्यासह माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी मंत्री भाजपचे नेते अजितराव घोरपडे, आ. शिवाजीराव नाईक, माजी आमदार दिनकर पाटील, प्रा. शरद पाटील असे दिग्गज नेते एकवटण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पॅनेलकडेही आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
समदु:खी नेत्यांचे पॅनेल उभारणार
By admin | Published: April 26, 2015 1:04 AM