कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासारख्या सामान्य जनतेच्या हृदयात स्थान असणाऱ्या नेत्याला विनाकारण अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. पण आजपर्यंत अनेक संकटे ताकदीने परतवणारे मुश्रीफ हे या संकटावर तितक्याच ताकदीने मात करतील व भाजपला पुरून उरतील. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी मंगळवारी येथे म्हटले आहे.
ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्याविरोधात भाजपच्या किरीट सोमय्या यांनी जे आरोप केले आहेत, त्या सगळ्या प्रकरणांमध्ये यापूर्वीच चौकशी झाली आहे. त्यांची आयकर विभागाकडूनची चौकशी तर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झाली. या सगळ्या चौकशीचे निरसन ज्या-त्यावेळी झाले असून, त्याचे अहवाल आजही वेबसाईटवर उपलब्ध आहेत. असे असताना तेच आरोप पुन्हा करून मुश्रीफ यांची बदनामी करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे.
दोन वर्षांचा काळ गेल्यानंतर महाराष्ट्रासारख्या प्रगतशील आणि सक्षम राज्याची सत्ता आपल्याकडे नाही, याचे शल्य भाजपला आहे. त्यातूनच महाविकास आघाडीतील नेत्यांना विविध मार्गाने टार्गेट केले जात आहे. मंत्री मुश्रीफ यांच्याबाबतीत जे काही घडते आहे, ते दुर्दैवी आहे. सामान्य माणसांशी नाळ जुळलेल्या त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने गेली चाळीस वर्षे राजकारणापलीकडे जाऊन जनतेची सेवा केली आहे. सामान्य माणसासाठी त्यांच्या घराचा दरवाजा भल्या पहाटेपासून उघडा असतो. पण त्यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे त्यांचे मन निश्चितपणे व्यथित होऊ शकते. निवडणुकीमध्ये आरोप-प्रत्यारोप होतच राहतात, परंतु निवडणूक झाल्यानंतर एकदा जनतेने निर्णय दिल्यानंतर एखाद्या लोकप्रतिनिधीच्या व्यक्तिगत मागे लागणे, हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे. सर्वसामान्य जनतेचा नेता असलेल्या मंत्री मुश्रीफ यांच्या पाठीशी या काळामध्ये आम्ही कणखरपणे उभे आहोत .