अशोक डोंबाळे -- सांगली -जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या स्पर्धेत तासगाव तालुक्यातील योजना शिंदे (मणेराजुरी), कल्पना सावंत (सावळज) आणि स्नेहल पाटील (येळावी) असून, यापैकी एक नाव सुचविण्याचे अधिकार आमदार सुमनताई पाटील यांना दिले आहेत. या गटाकडून शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र त्या अपक्ष असल्याचे कारण पुढे करून भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी त्यांना विरोध केला आहे. अन्य पदाधिकारी निवडीसाठी जत, आटपाडी तालुक्यातील स्थानिक नेत्यांचे एकमत होत नसल्यामुळे, विद्यमान पदाधिकाऱ्यांचे राजीनामे लांबणीवर गेले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका वर्षभरावर आल्यामुळे, भाजप व शिवसेना नेत्यांना दुखविणे राष्ट्रवादीच्या नेत्यांना परवडणारे नाही. परिणामी तेही सावध पवित्रा घेत आहेत.जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य १८ फेब्रुवारी २०११ रोजी निवडून आले आहेत. त्यांचा कार्यकाल दि. १८ फेब्रुवारी २०१७ रोजी संपत असल्यामुळे त्यापूर्वी निवडणुका होणार आहेत. यामुळे उर्वरित कालावधीसाठी पदाधिकारी निवडताना कोणताही मित्रपक्ष आणि त्यांच्या नेत्यांना दुखविणे राष्ट्रवादीला परवडणारे नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांनी भाजप, शिवसेना नेत्यांशी चर्चा करूनच पदाधिकारी निवडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सांगलीत जयंत पाटील, शिंदे, माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, खासदार संजयकाका पाटील, आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि शिवसेनेचे नेते आमदार अनिल बाबर यांची दोन दिवसांपूर्वी बैठक झाली. अध्यक्षपदाच्या उमेदवारावरून राष्ट्रवादीचे नेते आणि भाजपच्या नेत्यांमध्ये मतभिन्नता आहे. अध्यक्षपद तासगावला देण्याचा निर्णय आर. आर. पाटील (आबा) यांच्या हयातीत झाला आहे. त्यांच्या शब्दास जयंत पाटील आणि विलासराव शिंदे बांधील असून, त्यांनी अध्यक्षपदाचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार आबांच्या कुटुंबियांकडे सोपविला आहे. आबा समर्थकांनी योजना शिंदे यांचे नाव सुचविले आहे, पण या नावास खासदार पाटील यांनी विरोध केला आहे. शिंदे या राष्ट्रवादी उमेदवाराचा पराभव करून निवडून आल्या आहेत, यामुळे त्यांना संधी देऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. खा. पाटील यांच्या भूमिकेला भाजपमधील नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी कल्पना सावंत यांचे नाव सुचविले आहे. मात्र सावंत यांनी सावळज ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपशी युती केल्यामुळे आबा समर्थकांचा त्यांच्या नावाला विरोध आहे.येळावी जिल्हा परिषद गटातील स्नेहल पाटील यांच्या नावाचा आयत्यावेळी विचार होऊ शकतो. पण, सध्या अध्यक्षपदाची चर्चा सावंत आणि शिंदे या दोन नावांभोवतीच सुरू आहे. या दोन गटांचे एकमत झाले नाही, तर शिराळा अथवा दिघंची गटातील सदस्यांनाही संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.आटपाडी-खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आ. अनिल बाबर आणि राजेंद्रअण्णा देशमुख गटाला प्रत्येकी एक पद दिले जाणार आहे. मनीषा पाटील यांनाच अध्यक्ष पदासाठी संधी देण्याची विनंती बाबर यांनी केली आहे. परंतु, पाटील यांच्या नावाला राष्ट्रवादी आणि देशमुख गटाने विरोध केला आहे. देशमुख व बाबासाहेब मुळीक यांनी, राष्ट्रवादीच्या सदस्यांनाच संधी देण्याची आग्रही मागणी जयंत पाटील व शिंदे यांच्याकडे केली आहे. बाबर यांनीही, राष्ट्रवादीतील कोणाला पदाधिकारी करणार, त्यांचे नाव निश्चित केल्यानंतरच विद्यमान पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजूर करावेत, अशी भूमिका घेतली आहे. जतमध्ये आमदार विलासराव जगताप आपल्या समर्थकाची सभापतीपदी वर्णी लावण्यासाठी नेत्यांकडे प्रयत्न करीत आहेत. यास सध्या राष्ट्रवादीतील गटाने विरोध केला आहे. राष्ट्रवादीचे काम करीत असणाऱ्यांनाच नेत्यांनी सभापती करावे, अशी मागणी चन्नाप्पा होर्तीकर, रमेश पाटील आदींनी जयंत पाटील यांच्याकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतून बाहेर गेलेल्या आणि सध्या भाजप, शिवसेनेत असलेल्या नेत्यांनी, आधी पदाधिकाऱ्यांची नावे निश्चित करा आणि त्यानंतरच विद्यमान पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजूर करा, अशी भूमिका घेतली आहे. वर्षभरावर आलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका लक्षात घेतल्यास, जयंत पाटील यांना भाजप, शिवसेनेतील नेत्यांना नाराज करून पदाधिकारी निवडणे परवडणारे नाही. कारण, राष्ट्रवादीतूनच सर्वाधिक नेते भाजप व शिवसेनेत गेले आहेत. जत, खानापूर, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व, आटपाडी तालुक्यात राष्ट्रवादीला त्याचा फटका बसणार आहे. यामुळे नवीन पदाधिकारी निवडीवेळी स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावे लागणार आहे. यातूनच पदाधिकाऱ्यांचे राजीनामे मंजुरी रखडल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीची खेळीआगामी जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप, शिवसेना नेत्यांबरोबर राष्ट्रवादीचे नेते आघाडी करून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. म्हणूनच राष्ट्रवादीचे नेते पदाधिकारी बदलामध्ये भाजप व शिवसेना नेत्यांची मने दुखविण्याच्या तयारीत नाही, अशी चर्चा जिल्हा परिषद सदस्यांमध्ये रंगली आहे. काँग्रेसही राष्ट्रवादीतील नाराजांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.झेडपीच्या कारभारावर जयंतराव नाराजजिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कारभार सुमार दर्जाचा असल्याबद्दल जयंत पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे या पदाधिकाऱ्यांना मुदतवाढ नाही. येत्या दोन दिवसात राजीनामे मंजूर होणार आहेत.
‘झेडपी’ पदाधिकारी निवडीसाठी नेत्यांचे सूर जुळेनात
By admin | Published: January 20, 2016 11:41 PM