पूर्वी राजकारणात निष्ठेला फार महत्त्व होते. मात्र, अलीकडील राजकारणात ‘निष्ठा’ हा शब्दच विसरल्याने नेतेही तसाच विचार करू लागले आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या सभोवतीचे निष्ठावंत कार्यकर्त्यांचे माेहोळ आणि आपल्या कार्यकर्त्यावर पुत्रवत प्रेम करणाऱ्या नेतृत्वाकडे पाहिले की, आजही कोठेतरी विचाराचे राजकारण जिवंत असल्याचा प्रत्यय येतो. त्यातूनच प्रा. किसन चौगले यांच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जिल्ह्याच्या सर्वोच्च शिखर संस्था असलेल्या ‘गोकुळ’मध्ये पाठवून मोठा सन्मान करण्यात आला. यामुळे राजकारण व नेत्यावरील सामान्य माणसाचा विश्वास दृढ होण्यास मदत होणार, हे मात्र नक्की आहे.
‘राधानगरी’सारख्या दुर्गम तालुक्यात कोणताही राजकीय वारसा नसताना ए. वाय. पाटील यांनी गेल्या २५ वर्षांत कार्यकर्तृत्वातून कार्यकर्त्यांचे जाळे तयार केले. जिल्हा बँक, ‘बिद्री’ साखर कारखाना, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून स्वत:चे राजकारण बळकट केलेच, मात्र ‘बिद्री’, जिल्हा परिषद, पंचायत समिती, शेतकरी संघ, बाजार समिती आदी विविध सत्तास्थानांवर सामान्य कार्यकर्त्याला संधी देऊन राजकारणाचा वेगळा पायंडा त्यांनी राधानगरीत घालून दिला. त्यामुळेच त्यांच्यासाठी जीव ओवाळून टाकणारा कार्यकर्ता तयार होऊ शकला.
एकीकडे मी आणि माझे कुटुंब असे राजकारणाचे गणित मांडले जात असताना दुसऱ्या बाजूला मात्र कार्यकर्त्यास सन्मान देणारे ए. वाय. पाटील यांच्यासारखे नेतृत्व आहे. ‘गोकुळ’च्या संचालक पदाची ‘क्रेझ’ वेगळी आहे, त्याला वेगवेगळे कंगोरेही आहेत. येथे आपल्या कुटुंबातील व्यक्ती जावी, यासाठी प्रत्येक नेत्याचा प्रयत्न असतो. यामुळे विधानसभेचे गणित अधिक सोपे होईल, असा काहींचा कयास आहे. पॅनलमध्ये बहुतांशी जणांनी आपल्या वारसदारांना रिंगणात उतरले असताना ए. वाय. पाटील यांनी मात्र सामान्य कार्यकर्त्याचे नाव पुढे करून खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराचे आपण पाईक असल्याचे एकप्रकारे दाखवून दिले. प्रा. किसन चौगले यांना उमेदवारीच दिली नाहीतर त्यांना चांगल्या मतांनी विजयी करण्यासाठी कंबर कसली. निवडणूक अटीतटीची होती, यामध्ये काय होईल, याचा अंदाज नव्हता. अशा वातावरणात माझ्या सामान्य कार्यकर्त्याला कोठे दगाफटका बसू नये, यासाठी ए. वाय. पाटील यांनी अंतर्गत लावलेल्या जोडण्या खरोखरच वाखाणण्यासारख्या आहेत. कार्यकर्त्याला संधी देऊन निवडून आणल्याने ए. वाय. पाटील यांची ‘राधानगरी’ मतदारसंघात एक वेगळीच प्रतिमा तयार झाली आहे. सामान्य माणसांमध्ये त्यांच्या विषयी आपुलकीची भावना निर्माण झाली आहे.
कार्यकर्त्यांबद्दलचे प्रेम आणि सामान्य माणसाबद्दलची कणवच त्यांना भविष्यातील राजकारणाला बळकटी देणारे ठरणार आहे, हे मात्र नक्की आहे.
- सुनील चौगले (आमजाई व्हरवडे)
ए. वाय. पाटील यांचा फोटो लावा