कोल्हापूर : अवयवदान करण्यात भारतात स्त्रिया पुरुषांपेक्षा अग्रेसर असल्याचे प्रतिपादन डॉ. राधिका जोशी यांनी येथे केले. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्यावतीने जागतिक अवयवदान दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात त्या बोलत होत्या.
डॉ. जोशी म्हणाल्या, नोंदणी केलेल्यांपैकी भारतात फक्त ४० टक्के रुग्णांना अवयव मिळतात तर दोन टक्के लोक ब्रेन डेथ झाल्यानंतर अवयवदानाला संमत्ती देतात. अमेरिकेत हेच प्रमाण ४० टक्के आहे. अवयवदानावर १९९५ साली कायदा झाल्यापासून सरकारचे नियंत्रण आहे. त्याचा मानवी व्यापार होत नाही. पण निष्कारण धार्मिक कारण देऊन चुकीचे गैरसमज पसरवले जातात. त्या समजूती काढून टाकल्या पाहिजेत. अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाच्या अवयवामुळे कुणाला तरी नवजीवन मिळू शकते. परंतु, स्वर्गात जायचे असेल तर एखादा अवयव नसून चालत नसल्याची गैरसमजूत या कामात अडथळे निर्माण करत आहे.
यावेळी अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. देवेंद्र जाधव यांनी हाडे ठिसूळ होण्याची कारणे व उपाय सांगितले. वुमन्स डॉक्टर विंगच्या अध्यक्ष डॉ. आशा जाधव यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नीता नरके यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ. गायत्री होशिंग यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला संस्थेच्या उपाध्यक्ष डॉ. गीता पिल्लई, डॉ. किरण दोशी, सहसचिव डॉ. ए. बी. पाटील, डॉ. भारती दोशी, डॉ. राजेंद्र वायचळ उपस्थित होते.
फोटो : १८०८२०२१-कोल-केएमए
कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या महिला शाखेतर्फे जागतिक अवयवदान दिनानिमित्त डॉ. राधिका जोशी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांचा असोसिएशनतर्फे डॉ. आशा जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. ए. बी. पाटील, डॉ. नीता नरके, डॉ. गीता पिल्लई, डॉ. देवेंद्र जाधव उपस्थित होते.