बाजारभोगाव : कोलिक (ता. पन्हाळा) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या षट्कोनी इमारतीला गळती लागली आहे. सुमारे सतरा लाख रुपये खर्चाच्या नवीन इमारतीचे काम गेली तीन वर्षे कासवगतीने सुरू आहे. परिणामी अपुऱ्या व गळक्या खोल्यांमुळे शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. याची चौकशी करावी, अशी मागणी कोलिकचे उपसरपंच शिवाजी कांबळे यांनी केली आहे.येथे पहिले ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत. शाळेची तीन खोल्यांची जुनी इमारत धोकादायक बनल्याने ती वापराविना पडून आहे. षट्कोनी दोन खोल्यांच्या स्लॅबमधून गळती सुरू आहे. तरीही अन्य पर्याय नसल्याने विद्यार्थ्यांना तेथेच बसविले जाते. त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होत आहे.सुमारे सतरा लाख रुपये खर्चाच्या नवीन इमारतीचे काम गेल्या तीन वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे. याकडे कारभाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. वेळेत काम पूर्ण न झाल्याने अपुऱ्या खोल्यांचा प्रश्न विद्यार्थी व शिक्षकांसाठी डोकेदुखी बनला आहे. आठ वर्ग कोठे बसवायचे हा शिक्षकांसमोर ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे. या नवीन इमारतीचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचे आहे.किचनशेडमध्ये भरतो एक वर्ग...अपुऱ्या खोल्यांअभावी येथील एक वर्ग शाळेच्या अंगणातील किचन शेडमध्ये बसविण्याची वेळ शिक्षकांवर आली आहे. तरीही शिक्षण विभागाचे अधिकारी रातांधळेपणाचे कर्तव्य बजावीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून, कोलिक प्राथमिक शाळेला वाली कोण ? अशी विचारणा जाणकारांतून व्यक्त होत आहे.
कोलिक प्राथमिक शाळेच्या इमारतीस गळती
By admin | Published: August 29, 2014 11:26 PM