उचगाव : गांधीनगरसह १३ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला सरनोबतवाडीजवळच्या मॅकडोनाल्ड्स हॉटेलजवळ गेल्या सहा महिन्यांपूर्वी गळती लागली आहे. मात्र, विद्युत विभाग व प्राधिकरण यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव असल्याने ही गळती अजूनही काढली नसल्याने रोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. या गळतीमुळे यातील बहुतांश गावांत अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईची मोठी झळ सोसावी लागत आहे. सिद्धनेर्ली येथील दूधगंगा नदीवरून गांधीनगरसह १३ गावांसाठी गांधीनगर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. या योजनेला सरनोबतवाडीजवळच्या मॅकडोनाल्ड्स हॉटेलजवळ गळती लागली. मात्र, जलवाहिनीला अडसर ठरलेल्या विद्युत डीपीमुळे गळती काढणे कठीण झाले आहे.
या ठिकाणची गळती काढण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांनी खुदाई करून ठेवली आहे. जवळच विद्युत डीपी असल्याने खुदाई करणे व गळती काढणे धोक्याचे बनले आहे. त्यामुळे गळती काढण्याचे काम तात्पुरते थांबविले आहे. परिणामी रोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. यामुळे उचगाव, गांधीनगर या मोठ्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. विद्युत विभाग व प्राधिकरण यांच्यामध्ये समन्वय नसल्याने हे गळती काढण्याचे काम पुढे सरकलेले नाही. गळतीमुळे उचगाव, गडमुडशिंगी, गांधीनगर, मणेरमळा भागांत पाणीपुरवठा अपुरा होत असल्याने टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्युत विभाग, संबंधित ग्रामपंचायत व जीवन प्राधिकरण यांच्या एकत्रित समन्वयाने यावर तोडगा काढून ही गळती काढावी अशी मागणी होत आहे.
..........................
चौकट
नवीन वाहिनी कार्यान्वित करणे गरजेचे
सदरची मुख्य वाहिनी ही २० वर्षांपूर्वीची असल्याने तिचे आयुष्यमान संपले आहे. यामुळे प्रादेशिक योजनेच्या जलवाहिनीला वारंवार अनेक ठिकाणी गळती लागत असून नवीन डक्टलाईन आयर्नच्या वाहिनीचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून, ती वाहिनी कार्यान्वित करणे गरजेचे बनले आहे.
कोट
गळती काढण्यासाठी जलवाहिनीजवळच्या विद्युत डीपीचा अडथळा आहे. कामे करताना विद्युत डीपीच्या वीजप्रवाहामुळे धोका आहे. या कारणामुळे गळती काढण्याचे काम थांबविले आहे. ग्रामपंचायत व विद्युत विभाग यांनी सहकार्य करावे.
- ए.डी. चौगुले
उपअभियंता
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
ही योजना १३ गावांची आहे. उचगावसारख्या ५० हजार लोकसंख्येच्या गावाला या योजनेतून पाणीपुरवठा होतो. जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे पाणीपुरवठा अपुरा होत आहे. गळती काढण्याची जबाबदारी पूर्ण करून पाणीपुरवठा सुरळीत करावा.
- दीपक रेडेकर, शिवसेना, उचगाव
फोटो १५ गांधीनगर पाणीपुरवठा
ओळ : सरनोबतवाडी (ता. करवीर) येथील मॅकडोनाल्ड्स हॉटेलजवळ गांधीनगरच्या नळपाणी योजनेला गळती लागून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
छाया : मोहन सातपुते