कुरुंदवाड : हेरवाड (ता. शिरोळ) येथे गेल्या महिन्याभरापासून गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती लागल्याने त्याचा परिणाम नळ पाणीपुरवठ्यावर झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे ऐन उरुसातच घरोघरी पै-पाहुणे आलेल्या हेरवाडकरांवर कूपनलिका, विहिरी या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. हेरवाडला पंचगंगा नदीतून पाणीपुरवठा होतो. मात्र, गेले दोन दिवस पाईपलाईनला गळती लागल्याने गावाला होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे़ त्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे़ त्याचबरोबर पाण्यासाठी कूपनलिका, विहिरीचा आधार ग्रामस्थांना घ्यावा लागत असून, यामध्ये विशेष करून महिला वर्गाची धावपळ होत आहे.पाणीपुरवठा करणारी टाकी व अंतर्गत पाईपलाईन जीर्ण झाल्याने वारंवार गळतीचे प्रमाण वाढत आहे. जीर्ण झालेल्या पाईपची गळती काढून देखील गावातील काही ठिकाणी पाईप जीर्ण झाल्यामुळे गळतीच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे़ याचा पाणीपुरवठ्यावर मोठा परिणाम होत आहे़ गेल्या काही दिवसांपासून येथील बसस्थानक चौकातील पाईपलाईनला अचानक गळती लागल्यामुळे त्याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. (वार्ताहर)‘पेयजल’ मार्गी लावा : ग्रामस्थांची मागणीहेरवाडसाठी दूधगंगा नदीपात्रातून मंजूर झालेली पेयजल योजना शेवटच्या टप्प्यात येऊन रखडली आहे़ या योजनेच्या माध्यमातून गावाला स्वच्छ व मुबलक पाणीपुरवठा होऊ शकतो़ मात्र, ही पेयजल योजना रखडली असून लोकप्रतिनिधींकडून ही योजना लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
योजनेला गळती, पाण्यासाठी फिरती
By admin | Published: April 20, 2017 11:52 PM