कोल्हापूर: केंद्र सरकारचा प्रत्येक विभाग नावीन्यपूर्ण कल्पनेला पाठबळ देण्यासाठी उत्सुक असतो. पण योग्य प्रस्तावाअभावी बऱ्याच वेळा हा निधी परत जातो. त्यामुळे या योजना प्रस्तावाचा विषय हा पारंपरिक ज्ञानाला छेद देणारा असला पाहिजे, अशी सूचना शास्त्रज्ञ डॉ. अनिरुद्ध पंडित यांनी केली. महाविद्यालयातील शिक्षकांनी अध्यापनाबरोबरच संशोधन, उद्योग विश्वाची देवाण-घेवाण, तसेच संशोधन प्रस्ताव, निबंध लिहिण्याचे कसब आत्मसात करून उत्तम शिक्षक बनावे, असे आवाहनही त्यांनी केले.
डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, कसबा बावडाच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाच्या संयोजनाखाली सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ व जगप्रसिद्ध काविटेशन टेक्निकचे जनक डॉ. अनिरुद्ध पंडित, कुलगुरू आयसीटी मुंबई यांनी संशोधन प्रस्ताव कसा लिहावा या महत्त्वपूर्ण विषयावर स्लाईड शोद्वारे ऑनलाईन सेमिनार घेतला. याचा लाभ देश-विदेशांतील पाचशे शिक्षक, संशोधक ,पदवीधर व पदवीच्या विद्यार्थ्यांनी घेतला.
डॉ. पंडित म्हणाले की, कुठल्याही सरकारी योजनेसाठी प्रस्ताव लिहिणे सुरू करणे आधी उद्देश, तसेच त्याची देश विकासाबरोबरच सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी असलेली गरज समजावून घेणे महत्त्वाचे असते. संशोधकांनी या योजना प्रस्ताव लिखाण करताना एखाद्या अनुभवी संशोधकांची मदत सुरुवातीला घेतल्यास उत्तम असते. आवश्यकतेनुसार उद्योगविश्व किंवा नामांकित विद्यापीठाबरोबर समझोता करार करावा.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांनी संशोधन प्रस्तावाची गरज सांगितली. परिचय संशोधन अधिष्ठाता व सेमिनार समन्वयक डॉ. अमरसिंह जाधव यांनी करून दिला. स्वागत, सूत्रसंचालन व आभार कार्य प्रा. राधिका धनाल यांनी पार पाडले.
फोटो: २९०५२०२१-कोल- डॉ. पंडित
(सिंगल फोटो आहे)