संदीप खवळे -कोल्हापूर -कोण परिस्थिती नाही म्हणून, तर कोण कर्मदरिद्री बापामुळे खेळण्या-बागडण्याचे विश्व बालमजुरीमध्ये घालवित आहेत़ नशेपासून झोपेला गादी पुरविणाऱ्या अनेक व्यवसायांत जिल्ह्यात बालकामगारांचे कोवळे हात राबत आहेत़ कमविल्याशिवाय इलाज नसल्यामुळे या बालकामगारांना कुणीही या शिक्षेतून बाहेर काढण्यासाठी मदत केली, तरी ते पुन्हा याच व्यवसायात येत आहेत; केवळ ठिकाण बदलले जात आहे़ बालकामगारांच्या बाबतीत ‘सकाळी कॉलेजमध्ये अन् रात्री बारमध्ये’ अशी परिस्थिती जिल्ह्यात आहे़ कोल्हापूर-गगनबावडा, कोल्हापूर-शाहूवाडी यांसह अन्य राज्य महामार्गांवरील अनेक बारमध्ये बालकामगार काम करीत आहेत़ पन्हाळा पोलीस ठाण्यांतर्गत कळे पोलीस दूरक्षेत्रांतर्गत तर हाकेच्या अंतरावर असलेल्या बारमध्ये बालकामगार काम करीत आहेत़ बालकामगार कायदा, १९८६ अनुसार १४ वर्षांपर्यंतच्या आणि आणि ज्युवेनाईल जस्टिस अॅक्ट, २००० अनुसार १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना कामावर ठेवणे हा गुन्हा आहे़ या कायद्यानुसार बालकांना कामावर ठेवणाऱ्यांना दंडाची तरतूदही करण्यात आली आहे़; पण राजरोसपणे या कायद्याचे उल्लंघन बार आणि धाब्यांमध्ये होत आहे़ नोव्हेंबरमध्ये ‘अवनि’ या सामाजिक संस्थेने याबाबत जिल्हाधिकारी कार्यालसमोर आंदोलनही केले होते़ तरीही पोलीस आणि जिल्हा प्रशासन या प्रश्नाबाबत गंभीर नसल्याचे चित्र आहे़ उसने घेतलेले दहा हजार रुपये फेडून घेण्यासाठी एका बापाने आपल्या मुलालाच मेंढपाळाकडे गहाण ठेवल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळगावात घडली आहे़ १४ वर्षांच्या महादेव नावाच्या मुलाला शेतमजुराने मेंढपाळाकडे गहाण ठेवले़ कारण काहीही असो, मजुरीचे भोग कोवळ्या वयात येणे ही एक शिक्षाच आहे़़़ असे अनेक महादेव जिल्ह्यातील धाब्यावर अन् बारवर, हॉटेलमध्ये बालमजुरीची शिक्षा भोगत आहेत़ जाता-येता डोळ्यांसमोर दिसणाऱ्या या गुन्ह्याकडे संबंधित यंत्रणेचे मात्र दुर्लक्ष होत आहे़ पिणाऱ्यांचा तोरा, त्यांची अर्वाच्च भाषा अन् मालकांची मुजोरी या सगळ्याला सामोरे जात ही मुले तळिरामांना पेले पोहोचवतात़ काही बालकामगार रात्री-अपरात्री मिळेल त्या वाहनाने घरी जातात़ शहरात राहणाऱ्यांना बारमध्येच राहिल्याशिवाय पर्याय नाही़ सामाजिक सुरक्षितता हरवून बसलेल्या या बालकांना योग्य दिशा देण्यासाठी आता पुढे पाऊल येण्याची गरज निर्माण झाली आहे, अन्यथा दमडीसाठी हजारोंचे भावविश्व असेच कोमेजत जाईल़आम्ही केलेल्या पाहणीत जिल्ह्यातील बार आणि धाब्यांवर बालकामगार असल्याचे निदर्शनास आलेले नाही़ बालकामगार काम करीत असल्याची माहिती कार्यालयास कळविल्यास संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल. - सुहास कदम, सहायक कामगार आयुक्त.
सकाळी शिकायला; रात्री बारमध्ये कामाला
By admin | Published: December 27, 2014 12:13 AM